Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडप्रशासकीय अधिकारी मालक नसून सेवक - कॉ. अजित नवले

प्रशासकीय अधिकारी मालक नसून सेवक – कॉ. अजित नवले

किसान सभेच्या जिल्हा अधिवेशनात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ची मागणी करणारा ठराव पारित

चंद्रशेखर सिडाम अध्यक्ष तर देविदास मोहकर सचिवपदी निवड

वणी : “अन्न उत्पादन करणारा शेतकरी जेव्हा अधिकाऱ्यांकडे आपल्या समस्या घेऊन जातो, तेव्हा प्रशासकीय अधिकारी एखाद्या मालकाप्रमाणे वागून शेतकऱ्यांच्या समस्यांची उपेक्षा करीत हेळसांड करीत असेल तर त्यांची दादागिरी खपवून घेऊ नये, प्रशासकीय अधिकारी मालक नसून आपले सेवक आहेत”, असे रोखठोक प्रतिपादन शेतकरी संपाचे नेते व किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. डॉ. अजित नवले यांनी किसान सभेचे वणी येथे झालेल्या यवतमाळ जिल्हा अधिवेशनात केले.

“अखिल भारतीय किसान सभा देशातील सर्वात मोठी शेतकरी संघटना असून देशातील शेतकऱ्यांच्या सर्वच आंदोलनात अग्रस्थानी राहून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत राहिली आहे. दिल्ली येथील वर्षभराच्या तीन काळे कृषी कायद्या विरुद्ध केलेले आंदोलन, शेतकरी संप तसेच देशातील ऐतिहासिक लॉंग मार्च सर्वच ठिकाणी किसान सभा अग्रस्थानी राहिली आहे आणि न्याय देण्यासाठी सरकारला बाध्य केले आहे. त्यामुळे लाल बावट्याच्या किसान सभेला कुणीही कमी लेखू नये”, असेही पुढे बोलताना कॉ. नवले गरजले. या प्रसंगी किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ. किसन गुजर, कॉ. उमेश देशमुख, कॉ. शंकरराव दानव यांनीही मार्गदर्शन केले. या वेळेस माकपचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी शुभेच्छापर भाषणातून संघटनात्मक विचार मांडले.

गेल्या तीन वर्षांच्या लेखाजोखा किसान सभेच्या जिल्हा सचिव देविदास मोहकर यांनी आपल्या अहवालातून मांडला, ज्यावर आलेल्या प्रत्येक तालुक्यातील निवडक प्रतिनिधींनी मते मांडून कमजोऱ्यांवर आत्ममंथन करून संघटना मजबूत करण्यावर जोर देण्यात आला. अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची ताबडतोब भरपाई, वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे ठराव कॉ. ऍड. डी. बी. नाईक, देविदास मोहकर, कॉ. शंकरराव दानव, ऍड. दिलीप परचाके यांनी मांडले. सर्वानुमते अहवाल व ठराव मंजूर करण्यात आले. या अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी नवीन जिल्हा समिती निवडण्यात आली.

किसान सभेच्या नवीन जिल्हा समिती मध्ये चंद्रशेखर सिडाम (अध्यक्ष), देविदास मोहकर (सचिव), ऍड.डी. बी. नाईक, शंकरराव दानव, ऍड. दिलीप परचाके, किसनराव मोहूर्ले, खुशालराव सोयाम, उरकुडा गेडाम, अनिता खुनकर, सुरेखा बिरकुरवार, कवडू चांदेकर, मनोज काळे, सदाशिव आत्राम, गजानन ताकसांडे, सुधाकर सोनटक्के आदींच्या समावेश आहे.

या अधिवेशनात वणी, मारेंगाव, झरी, केलापूर, राळेगाव, कळंब, महागाव आदी व अन्य तालुक्यातील निवडक प्रतिनिधींनी भाग घेतला होता. सुरुवातीला जिल्ह्यातील जेष्ठ सदस्य किसनराव मोहूर्ले यांचे हस्ते विळा हातोडा चिन्ह असलेले लाल झेंड्याला फडकविण्यात येऊन वंदन करण्यात आले आणि अधिवेशनाच्या शेवटी सुद्धा प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय