आमदार महेश लांडगे- आयुक्त शेखर सिंह यांची बैठक
पिंपरी चिंचवड:
पिंपरी-चिंचवडमधील H3N2 च्या संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका आरोग्य यंत्रणा सतर्क करा.कोणत्याही परिस्थितीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होता कामा नये, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.
शहरात H3N2 च्या संसर्गामुळे वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला, असे वृत्त कळल्यानंतर आमदार लांडगे मुंबई येथील अधिवेशनातून तातडीने शहरात दाखल झाले. त्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याशी सायंकाळी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे,स्व.यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयाचे ‘डीन’ डॉ.राजेंद्र वाबळे,सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे उपस्थित होते.
H3N2 चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात.शहरातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये यासाठी १० बेड राखीव ठेवावेत.ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत प्रशासनाने सर्वोत्तम आरोग्य सुविधा द्यावी.तसेच, संबंधित रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला? याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी दिल्या आहेत.
‘त्या’ रुग्णाचा मृत्यू एकाच वेळी अनेक आजारामुळे!
H3N2 चा संसर्ग झाल्यामुळे एका वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.मात्र,संबंधित वृद्ध नागरिक यांचे वयोमान आणि एकाचवेळी अनेक व्याधी यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे मृत्यू झाला आहे. याबाबत अहवाल आल्यानंतर सविस्तर माहिती देणार आहोत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. पण, भयभीत होऊ नये, असे आवाहन डॉ.गोफणे यांनी केले आहे.
महापालिका प्रशासनाचे आवाहन
H3N2 संसर्गाबाबत महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार तयारी केली आहे.प्रत्येक रुग्णालयात राखीव बेड आहेत. प्रसंगी एक रुग्णालय पूर्ण याच उपचारासाठी उपलब्ध केले जाईल.कोविड सारखी परिस्थिती होणार नाही. रुग्ण संख्या वाढल्यास वायसीएमसुद्धा H3N2 च्या उपचारासाठी खुले करण्यात येईल.नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.काही लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करावी,असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाच्या वतीने उद्या पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.