रत्नागिरी/रुपेश चवंडे– श्रावण महिना म्हणजे, श्रवणभक्तीचा महिना. याच महिन्यात सण, उत्सव, व्रतवैकल्य आणि अनेक देवतांच्या मंदिरात चालू असलेला हरिनाम सप्ताह. गुरुभक्तीच्या या सोहळ्यात मनाचं नमःकरत डुंबून जाण्याचा महिना, या श्रावण महिन्यातील खास करून कोकणातील अनेक मंदिरात चालू असलेला हरिनाम सप्ताह यांची आख्यायिका फार वेगळी आहे. भक्तांनी केलेल्या नवसातून या आख्ख्यायिकेचा जन्म झाल्याची बोलवा नामसप्ताह दरम्यान ऐकायला मिळत आहे. हे विश्व ज्याने निर्माण केले त्या विश्वाचादाता असणाऱ्या विश्वेश्वराला आणि त्याचा दास असणाऱ्या कालभैरवाला त्याच्या भक्तांनी साथ घालतात ते दोघेही आपल्या भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतात आणि त्यांची घोरसंकटाच्या दाढेतून अलगद सुटका करतात.
साधारणता शंभर वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीने कोकणात थैमान घातलं होतं. एकाची अंत्ययात्रा संपवून, घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच दुसरा यमसदनी गेलेला असायचा. अशा परिस्थितीत सैरभैर झालेली माणसं सात आटोक्यात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करून थकली, भागली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नव्हतं. अशा या भयाण परिस्थितीत शेवटी मांडवी येथील नागरिकांनी आपल्या भैरीदेवाला तर, काळबादेवी येथील ग्रामस्थांनी रामेश्वराला आणि, राजीवडा येथील लोकांनी स्वयंभू श्री काशी विश्वेश्वराला एकाच दिवशी सामूहिक साद घातली, गाऱ्हाणं घातलं, तुझ्या भक्तांचे जीवन संपवून यमाच्या हवाली करणाऱ्या प्लेगच्या साथीला पायबंदी कर, आवर घाल.
या बदल्यात आम्ही दरवर्षी श्रावण मासातल्या पहिल्या सोमवारी तुझा हरिनाम सप्ताह, तुझ्या मंदिरात चालू करू. त्रैलोक्याचा अधिपती असणारा हा भोलेनाथ आपल्या भक्तांच्या नवसाला भुलला आणि त्याने त्वरित आपल्या भक्तांवर आलेल्या संकटाचे निवारण केलं आणि भक्तांना भयमुक्त ही केलं. तेव्हापासून संपूर्ण भारतात आणि खास करून कोकणातील, रत्नागिरी शहरातील मांडवी येथील भैरी मंदीरात, राजीवडा येथील स्वयंभू काशी विश्वेश्वराच्या मंदीरात आणि काळबादेवी गावातील रामेश्वराच्या मंदीरात एकाच दिवशी सुरू झालेला पहिला नामसप्ताह आज शंभर वर्षाचा कालखंड लोटल्यानंतर सुद्धा अविरतपणे चालूच असून या सोहळ्यात स्वतःचा सहभाग नोंदवणारे भक्त, त्या भैरीदेवाची, विश्वेश्वराची आणि साक्षात रामेश्वराच्या कृपेची प्रचिती अनुभवताना दिसतात.