Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजागतिक लोकसंख्या दिनानिमित्त एक अपत्य, दांपत्याचा सत्कार, आकुर्डीत परिसंवाद

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त एक अपत्य, दांपत्याचा सत्कार, आकुर्डीत परिसंवाद

पिंपरी चिंचवड : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कष्टकरी संघर्ष महासंघ, दिलासा संस्थेच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त राष्ट्रीय कुटुंब कल्याण अभियानातर्गत एका अपत्यावर शस्त्रक्रिया केलेल्या दापत्यांचा सत्कार कामगारभूषण राजेंद्र वाघ यांचे हस्ते करण्यात आला.

अध्यक्षस्थानी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कवयित्री राधाबाई वाघमारे, पंतप्रधान श्रमवीर पुरस्कार प्राप्त सुभाष चव्हाण त्याचबरोबर मनोहर दिवाण, सचिन गटणे, शोभा जोशी, सविता इंगळे, जयवंत भोसले, कवी दत्तु ठोकळे, रंजना वाघ, राजू जाधव, ओमप्रकाश मोरया, निरंजन लोखंडे हे मान्यवर उपस्थित होते.

“लोकसंख्या वाढीमुळे महागाई आणि बेकारीचा भस्मासुर निर्माण झाला आहे कां?” या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, प्रा.दिगंबर ढोकले, सुभाष चव्हाण यांनी सहभाग घेऊन विचार व्यक्त केले. ‘लोकसंख्या नियंत्रणात आणली नाही तर मोठा विस्फोट होईल आणि  आपल्या देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल’ असा दूरदृष्टीचा विचार पुरुषोत्तम सदाफुले यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे उद्घाटन “बस एक बच्चा चाहिए आदमी के लिये” या कवितेने करण्यात आला. वर्षा बालगोपाल, उज्वला आणि कैलास भैरट, सावनी आणि स्वानंद राजपाठक, मेघा आणि रामहरी काकडे, सुप्रिया आणि सुनील सोळाकुरे यांचा एका अपत्यावर शस्त्रक्रिया करून कुटुंब नियोजन केले म्हणून सन्मान करण्यात आला. एका कन्येला दत्तक घेतले म्हणून अंजली अन् नितीन जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शासनाच्या कुटुंब कल्याण विभागात उत्तम काम करणाऱ्या ज्योती देशकर, अर्चना ससाणे यांचा गौरव करण्यात आला.

परिसंवादात सदाफुले म्हणाले, कुटुंब नियोजन व लोकसंख्या नियंत्रित आणणे हा कार्यक्रम कोण्या एका जात धर्म पंथाच्या विरोधात नसून सर्वांचाच राष्ट्रीय कार्यक्रम आहे. यावेळी सुभाष चव्हाण यांनी “हिंदू असो वा मुस्लिम एक परिवार एक संतान” असे म्हणत “मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी” त्यांनी मुलीचे महत्त्व तसेच एका अपत्याचे महत्त्व विषद केले.

प्रा. दिगंबर ढोकले सरांनी माती संगे पुष्पासहि गंध लागे,  एक आदर्श कुटुंब आदर्श मुलांचे संस्कार कसे असावा हे सांगत त्यांनी कुटुंब कल्याण नाही केलं तर लोकसंख्येचा विस्फोट भस्मासुर बाहेर येईल असे मत व्यक्त केले. नखाते यांनी शेजारील राष्ट्र श्रीलंका व पाकिस्तानमध्ये होत असलेली महागाई, बेरोजगारी हा मुद्दा पुढे करून भविष्यामध्ये रोजगार व महागाई व लोकसंख्या नियंत्रणात आणली नाही तर आपल्याकडे अशीच स्थिती येणार आहे. एक आदर्श देश आणि राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्यक्षात सर्वांनी लोकसंख्या आटोक्यात ठेवण्याचा निर्धार करणे गरजेचे आहे असा विचार व्यक्त केला.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय