मुंबई : राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आज विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक सादर करण्यात आले. हे विधेयक एकमताने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हे विधेयक विधिमंडळात मांडण्यात आले. आवाजी मतदानाने मराठा आरक्षण हे विधेयक एकमताने समंत करण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाला आता शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात मराठा आरक्षणामागील भूमिका मांडली. राज्यातील मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत मिळणारे, टिकणारे आरक्षण असेल. हा कायदा कोर्टात टिकेल, याबाबत आपण खात्री बाळगूया, असे प्रतिपादन त्यांनी केले. मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि टिकणारा आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी एकमताने हे विधेयक संमत करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
तसेच, २२ राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण आहे. हे विधेयक कोर्टामध्ये नक्की टिकेल. न्या. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील आयोग हा वैध आहे.
दरम्यान, या विधेयकाला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. विरोधी पक्षनेते विजय वडट्टेवारी यांनी बोलताना सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. हे विधेयक एकमताने मंजूर करण्यास आपला पाठिंबा आहे.