मुंबई : शिंदे-भाजप सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला. अजित पवार शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या अचानक झालेल्या घडामोडीने सर्वांनाच धक्का बसला. अजित पवार यांच्या सरकारमधील सहभागामुळे शिंदे गटाची मोठी अडचण झाली आहे.
गेल्या वर्षी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिंदे समर्थक आमदारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अनेक आरोप केले होते. विशेषतः अजित पवार यांच्यावर पुरेसा निधी देत नसल्याचे आरोप शिंदे गटाकडून करण्यात आले होते. मात्र आता अजित पवार हेच खुद्द सरकारमध्ये सहभागी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराजी वाढताना दिसत आहे. यासोबच एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशा उलट सूलटही चर्चा सुरू झाल्यात आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री शिवसेनेचे आमदार तसेच खासदारांची वर्षा या शासकीय निवास्थानी बैठक घेतली. यावेळी शिंदेंनी आपल्या आमदारांसमोर एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्रीपदी मीच कायम राहणार असून २०२४ मध्ये ५० पेक्षा जास्त जागा आपल्याला लढवायच्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या राजीनाम्याच्या बातम्या कोण पेरत आहेत हे देखील मला माहीत आहे. संकटकाळात पाठिंबा देणाऱ्या सर्व ५० आमदारांना आपण निराश करणार नाही, असं देखील ते म्हणाले. या सोबतच त्यांनी आपल्या सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.