अहमदनगर : पोलिओप्रमाणे गावोगावी कोरोनाचे लसीकरण सुरू करावे, अशी मागणी राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी पदवीधर सेलचे नेते सुशिलकुमार चिखले यांनी केली आहे.
यासंबंधीचे पत्र चिखले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार डॉ. किरण लहामटे यांना दिले आहे.
चिखले यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र वेधला गेला आहे. या संकटकाळात महाविकास आघाडी सरकार उल्लेखनिय काम करत आहे. सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच राज्यात लसीकरण ठिकठिकाणी सुरू आहे, मात्र ठराविक ठिकाणीच लसीकरण सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होत आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक होण्याचा धोका निर्माण होत आहे. यामध्ये बदल करून गावोगावी लसीकरण सुरू करणे गरजेचे आहे. पोलिओप्रमाणे गावोगावी लसीकरण सुरू केल्यास गर्दी कमी होईल व कोरोनाचा फैलाव देखील टाळता येऊ शकतो, असेही चिखले यांंनी म्हटले आहे.