– एक तिर एक कमान सारे आदिवासी एक समान !
– जल, जंगल, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची !
– विश्व आदिवासी दिनानिमित्त दरी खोऱ्यात घुमला जयजयकार…
सुरगाणा (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यातील वांगण सुळे येथे मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रथमतः जागतिक आदिवासी दिन व तो का साजरा केला जातो याचे महत्त्व मान्यवरांनी सांगितले. आदिवासी समाजाचे जल, जंगल व जमीन यांच्याशी अतूट असे नाते आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात एक झाड लावावे ते झाड लावले असे नाही त्याला दिवसा आड पाणी घालावे, प्रत्येकाच्या घरचे १८ वर्षापुढील कोवीड – १९ प्रतिबंधक लस घ्यायला सांगावे, तसेच आजच्या घडीला शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे मत गावातील जेष्ठ नागरिक गोविंद धूम यांनी व्यक्त केले.
क्रांतीची धगधगती मशाल घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर क्रांती विरांचा स्मृतीदिन म्हणून जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो तसेच जलपरिषद मित्र परिवारातर्फे एक झाड लेकीचे हा उपक्रम नाविन्यपुर्ण असून त्यात प्रत्येकाने सहभाग घ्यावा. आदिवासी हा मुळ जंगलाचा राजा ओळखला जातो आजच्या वातावरणात पोषक हवामान व पृथ्वीचा समतोल राखायचा असेल तर वन संपत्तीशिवाय पर्याय नाही, असे माजी आमदार जे.पी.गावित म्हणाले. तसेच आलेल्या मान्यवरांच्या हस्ते चिंच या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्य सुभाष चौधरी, शिक्षक बाळू चौधरी, नामदेव चौधरी, मंगळदास गवळी, राजकुमार चौधरी, पोलीस पाटील परशराम चौधरी, बळवंत जाधव, मोहन चौधरी, नाना राऊत, विठ्ठल धूम तसेच आदिवासी युवा प्रतिष्ठानचे शिवराम टोपले, गणेश चौधरी, कैलास धूम, चिंतामण टोपले, नामदेव लोखंडे, अरविंद टोपले, प्रल्हाद चौधरी, विनायक जाधव, अशोक टोपले, उत्तम धूम, रेवणनाथ टोपले तसेच जलपरिषद मित्र दौलत चौधरी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.