विधानसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडी बरोबर (Mumbai)
महाविकास आघाडीच्या प्रचारात राज्यभर सक्रिय सहभाग घेणार; पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचा निर्णय
मुंबई / क्रांतीकुमार कडुलकर – राज्यात शेतकरी, युवक, कामगार व शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेले गंभीर प्रश्न व मोठ्या प्रमाणात फोफावलेली असहिष्णुतेच्या विरोधात आवाज उठवून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सातत्याने आंदोलन करुन नागरिकांमध्ये जागृती केली आहे या विधानसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडी बरोबर असून आघाडीमध्ये शिरपूर एसटी राखीव जागा पक्षाला सोडण्यात आली असून पक्षाने बुधा मला पावरा यांना तर वणी मतदार संघात अनिल हेपट यांना उमेदवारी दिली आहे. (Mumbai)
भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिरपूर व वणी दोन जागेवर निवडणूक लढवित असून राज्यातील बाकी सर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय सहभाग घेवून महाविकास आघाडी चे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार मुंबई येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला.
सोमवारी (दि.4 नोव्हेंबर) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात बैठक पार पडली. भाकपचे राष्ट्रीय सचिव कॉ. डॉ भालचंद्र कांगो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पक्षाचे राज्य सचिव कॉ. ॲड सुभाष लांडे, सहसचिव कॉ प्रा राम बाहेती, कॉ राजू देसले, सचिव मंडळ सदस्य कॉ. तुकाराम भस्मे, कॉ प्रकाश रेड्डी, कॉ सुकुमार दामले, कॉ राजण क्षीरसागर, शाम काळे, कॉ. स्मिता पानसरे, कॉ. शिवकुमार गणवीर, आदी प्रमुख उपस्थित होते. (Mumbai)
या बैठकीत राज्यातील पाटपाणी, शेतकऱ्यांचा हमी भावाचा प्रश्न, ऊस, कापूस, सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर यांसारख्या पिकांना हमी भाव, मोफत वीज, कामगारांचे किमान वेतन, विद्यार्थी युवकांचे शिक्षण व नोकरी, जातिनिहाय जनगणना आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून सोडवून घेण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना तन, मन, धनाने सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर पक्षाच्या जनसंघटना किसान सभा, आयटक कामगार संघटना, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, ऑल इंडिया युथ फेडरेशन, भारतीय महिला फेडरेशन, लाल बावटा शेतमजूर युनियन तसेच सांस्कृतिक आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कॉ. डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले की, महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार हे राजकीय जुमलेबाजी करून सत्तेवर आलेले सरकार असून, जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करीत आहे. दलीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या कल्याणकारी निधीवर डल्ला मारत आहे. अनैतिक व भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेल्या अभद्र महायुतीला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी सर्वांनी महाविकास आघाडीच्या बाजूने उभे रहावे.
शेतकरी कामगार, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारे महायुतीचे सरकार घालवून त्याजागी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉ. ॲड. सुभाष लांडे म्हणाले की, ही विधानसभेची निवडणूक दलीत, आदिवासी, शेतकरी, कामगार विद्यार्थी युवक यांचे भवितव्य ठरवणारी निवडणूक असल्याने या सर्व समाज घटकांच्या उज्वल भविष्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष कसोशीने प्रयत्न करणार आहे. (Mumbai)
सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचा आदेश पाळणार असून, राज्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय सहभाग घेतील.