भारताने आयोजित केलेल्या G-20 बैठकीत भारताला आणखी एक धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियासोबत तीव्र मतभेदांमुळे ग्रुप ऑफ सेव्हन (G-7) देशांनी ‘फॅमिली फोटो’ला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.
या आधी जपान आणि दक्षिण कोरियासारख्या महत्त्वाच्या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युक्रेनच्या मुद्द्यावर मतभेद असल्याने वैयक्तिक कारणे सांगून बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, दिल्लीत सुरू असलेल्या G-20 बैठकीत भाग घेणारे सात देशांचे परराष्ट्र मंत्री रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्यासोबत फोटो फ्रेम शेअर करण्यास तयार होणार नाहीत. G-20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पारंपरिक फोटो सेशन होणार नसण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.
G-7 देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान यांचा समावेश आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेला रशियन हल्ला आणि रशियासोबत तीव्र मतभेदांमुळे जी-7 ने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जी-7 देशांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव जी-20 अधिवेशनाला संबोधित करताना त्यांच्यावर बहिष्कार टाकणार नाही, असा निर्णय घेतला आहे. उलट त्यांचे मंत्री त्या सत्रादरम्यान तिथेच राहतील परंतु गट फोटोंमध्ये भाग न घेता रशियाला वेगळे पाडण्याच्या दिशेने प्रतिकात्म भूमिका बजावतील.
यापूर्वी 2022 मध्ये इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या G-20 परिषदेत G-7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी गट फोटोत सहभागी होण्यास नकार दिला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याऐवजी रशियाचे परराष्ट्र मंत्री लॅवरोव्ह शिखर परिषदेला उपस्थित असूनही, इंडोनेशियातील संपूर्ण शिखर परिषदेदरम्यान एकही ग्रुप फोटो घेण्यात आले नाही.