Friday, December 27, 2024
Homeग्रामीण15 जानेवारी : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत 'लाँग मार्च'

15 जानेवारी : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत ‘लाँग मार्च’

मुंबई : दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या  शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या  ‘किसान अलायन्स मोर्चा’ तर्फे १५ जानेवारी रोजी भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान दरम्यान लाँँग मार्च काढण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारने मंजूर केलेले शेती विषयक कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आणि भांडवलदारांच्या हिताचे असल्याचा आरोप करीत देशभरातील शेतकऱ्यांनी गेल्या एक महिन्यापासून दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांचे नाही तर सर्वसामान्य जनतेचाही त्याला पाठिंबा आहे, हे दर्शविण्यासाठी विविध संघटनांनी एकत्र येऊन ‘किसान अलायन्स मोर्चा’ या मंचाची स्थापना केली आहे. शंभरहून अधिक संघटना या मंचामध्ये सहभागी झाल्या आहेत. या मंचातर्फे १५ जानेवारीच्या लाँग मार्चची घोषणा करण्यात आली.

 यावेळी निवृत्त न्या. बी. जी. कोळसे पाटील, पर्सनल लाॅ बोर्ड अॅण्ड मिल्ली कौन्सिल चे मौलाना सय्यद अतहर, व्हीजेएनटी/ओबीसी/अतीपिछडा जाती आॅल इंडिया बंजारा समाज अॅड. राकेश राठोड,छत्रपती संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष सचिन कांबळे, मुंबई अमन कमिटीचे अध्यक्ष फरीद शेख, मातंगढ उदासीन आश्रम चे महंत बाबा सत्यनामदास, जमाते अहले सुन्नी चे अध्यक्ष मौलाना ऐजाझ काश्मिरी, जमाते इस्लामी हिंद चे उपाध्यक्ष डाॅ. सलीम खान, दैनिक हिंदुस्थान चे मुख्य संपादक सर्फराज आरझू, जमाते इस्लामी हिंद चे सचिव शाकीर शेख, मुलभूत अधिकार संघर्ष समितीचे प्रभाकर नारकर उपस्थित होते. 

 

सरकारने 3 कृषी कायदे परत मागे घ्यावेत आणि एमएसपीला (किमान आधारभूत किंमत) कायद्याचा आधार देऊन त्याची अमलबजावणी निश्चित करावी, शेतकऱ्यांना माफक दरात बी बियाणे व खते पुरवठा करण्याची व्यवस्था करावी, शेत मालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देण्यासह स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशी तात्काळ लागू करा, या मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे. 

 

प्रत्येक मुंबईकर हा गाव-खेड्यातूनच आलेला असून त्यामुळे शेतकऱ्यांशी त्याचे रक्ताचे नाते आहे. त्यामुळे मुंबईकरांनीही या लाॅन्ग मार्च मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

संबंधित लेख

लोकप्रिय