Sunday, May 19, 2024
Homeराज्यअलिबाग येथे १० हजार शेतकरी - कामगारांची केंद्र सरकारच्या विरोधात निषेध रॅली

अलिबाग येथे १० हजार शेतकरी – कामगारांची केंद्र सरकारच्या विरोधात निषेध रॅली

अलिबाग (रायगड) : अलिबाग येथे १० हजार शेतकरी – कामगारांची विशाल रॅलीने काढत शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार संघटनांनी केंंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार कायद्याचा विरोध केला. 

आज २६ नोव्हेंबर रोजी रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून लाल बावटे हाती घेऊन आलेल्या १० हजार हून अधिक शेतकरी – कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकरी कामगार पक्षाने या विशाल मोर्चाचे नेतृत्व केले.

जाहीर सभेस माकपचे केंद्रीय कमिटी सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, आ. बाळाराम पाटील, माजी आ. धैर्यशील पाटील, माजी आ. पंडित पाटील, राजू कोरडे यांनी संबोधित केले. 

जाहीर सभेत हरियाणा व इतरत्र भाजपच्या राज्य सरकारांनी दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस दडपशाही करून रोखण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा ‘लोकशाहीची हत्या’ असा आरोप करत निषेध करण्यात आला. 

मोदी सरकारने देशीविदेशी कॉर्पोरेटसना मालामाल करण्यासाठी केलेले तीन शेतकरीविरोधी कायदे आणि चार कामगारविरोधी श्रम संहिता यांचे घातक स्वरूप समजावून सांगून त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच मोदी सरकारचे विजेचे दर प्रचंड वाढविणारे वीज विधेयक त्वरित मागे घ्यावे ही मागणी करण्यात आली. 

२६ नोव्हेंबर हा संविधान दिवस असल्यामुळे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार असलेल्या राज्यघटनेतील सार्वभौमत्व, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संघराज्य रचना आणि सामाजिक-आर्थिक न्याय या मूलभूत तत्त्वांवर केंद्र सरकार जे गंभीर हल्ले करत आहे, त्यांना कसून प्रतिकार करण्याचा निर्धार सभेने केला. 

२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांच्या मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे, अशोक कामते, विजय साळसकर व तुकाराम ओंबळे हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि इतर अनेक निरपराध लोक यांना सभेने श्रद्धांजली वाहिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय