Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपंधराशे रुपये मिळाले ३ हजार कधी देता बोला; कष्टकऱ्यांचा महापालिकेला सवाल

पंधराशे रुपये मिळाले ३ हजार कधी देता बोला; कष्टकऱ्यांचा महापालिकेला सवाल

पिंपरी, दि. १२ : टाळेबंदी मध्ये कष्टकरी कामगारांना दिलासा म्हणून अर्थसहाय्य राज्य शासनाने ५४७६  कोटी रुपये जाहीर केले. त्यानुसार अनेक कष्टकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला यात शहरातील फेरीवाला, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, रिक्षाचालक यांचा समावेश आहे. राज्य शासनाने मदत जाहीर केली  त्याच्या दुसऱ्याच दिवशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी शहरातील कष्टकऱ्यांना तीन हजार रुपये देऊ असे माध्यमात जाहिर केले व मोठी प्रसिद्धी मिळवली. राज्यात असा लाभ देणारी एकच महापालिका असा तोरा मिरवला  मात्र महापालिकेने यू-टर्न घेतला असून आता लाभ देता येणाार नाही अशी भुमिका घेतली. अशी लबाडी करु नका, तोंड़ाला पाने पुसु नका, पैसे कधी मिळणार, असा सवाल करत तीव्र आंदोलन करू, असा इशारा कष्टकरी वर्गाने दिला आहे.

कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज कोरोना चे नियमाचे पालन करत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, महादेव शेंडगे, जय राठोड, मनीषा मिरपगार ,पार्वती हळनोर व अन्य उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले, “कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये सत्ताधारी आणि महापालिकेने जो निर्णय घेतला तो अंतिम ठरवावा आणि अनेक गोष्टी ज्या नियमात आहेत. त्याही आणि नियमात नसणाऱ्यांही प्रशासन आणि सत्ताधारी मिळून नियमात बसवत असतात. आणि अनेक प्रकल्प करत असतात.  त्यामुळे कष्टकऱ्यांना जो लाभ द्यायचा तो नियमांमध्ये बसवून त्यांना लाभ द्यावा, त्यांना आशा दाखवून त्यांच्या तोंडाला पाने पुसू नये.

महापालिकेने फेरीवाले, गटई कामगार, रिक्षाचालक, कलाकार, घरेलू कामगार, यांना ३० एप्रिल च्या  सर्वसाधारण सभेत दुर्बल घटकाना प्रत्येकी तीन हजार रुपये मदत करण्याचा ठराव करण्यात आला. मात्र वेगवेगळी कारणे देऊन यामध्ये यू-टर्न घेतला जात आहे. यापूर्वी शहरातील नागरिकांनी अनेक वेळा का दिरंगाई होते विचार विचारले असता सत्ताधारी मंडळींनी कायदेशीर बाबी तरतूद पाहून आम्ही देणार आहोत, असे जाहीर केले व दोन महिने टाळाटाळ केली. 

मात्र कायदेशीर बाबी पडताळून सुद्धा त्यांना लाभ कसा देऊ शकत नाही?  असा सवाल केला आहे. तसेच वेगवेगळी कारणे दाखवून शहरातील कष्टकरी व गरीब कामगारांना दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मात्र शहरातील कष्टकरी वर्ग अशा वर्तणुकीला माफ करणार नाही. द्यायचे नाही तर बोलायचे नाही आणि बोलले तर लाभ दिलाच पाहिजे. अर्थ सहाय्य लवकर द्यावे, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही नखाते यांनी यावेळी दिला.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय