मुंबई : दुध उत्पादन शेतकऱ्यांना दुधाला किमान ३० भाव द्या, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. किसान सभेने एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.
लॉकडाऊन पूर्वी शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी ३० ते ३५ रुपये प्रती लिटर दर मिळत होता.मात्र आज परिस्थिती काही प्रमाणात पूर्वपदावर येऊन सुद्धा शेतकऱ्यांना दुधासाठी केवळ १७ रुपये प्रती लिटर दर दिला जात आहे. मात्र वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अतिशय कमी असल्याने आता किसान सभा आक्रमक झाली आहे.
मध्यंतरी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १० लाख लिटर दुध खरेदी करून यापासून पावडर बनविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय केवळ मोजक्या सहकारी संघांना लागू करण्यात आला होता. राज्यात दुध संकलनांपैकी ७८ टक्के दुध संकलित करणाऱ्या खासगी संघ व कंपन्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील १२ तालुक्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा अंशतः लाभ मिळाला.अटी व शर्तीमुळे १० लाख लिटर पैकी प्रतिदिन केवळ निम्मेच दुध सरकार खरेदी करू शकले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असं या पत्रात म्हंटलं आहे.
सरकारने दूध उत्पादकांचा अधिक अंत पाहू नये. चर्चा व बैठकांमध्ये चालढकल करू नये. निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना प्रतिलिटर १० रुपये अनुदान देत संकटाच्या काळात मदत करावी. अन्यथा आंदोलन भडकले व याची जबाबदारी सरकारची असेल.
डॉ. अजित नवले
राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय किसान सभा
दरम्यान मागच्या काही दिवसांपासून दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभा विविध मार्गांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने यांवर चर्चा करण्यासाठी येत्या २१ जुलै रोजी बैठक ही आयोजित केली आहे. मात्र सरकारला सर्व प्रश्न माहिती असून सरकारने चर्चेत वेळ न घालवता तात्काळ प्रति लिटर दहा रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी किसान सभेने केली आहे.
सरकारने या प्रश्नांबाबत रास्त तोडगा न काढल्यास अखिल भारतीय किसान सभा इतर समविचारी संघटनांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेन असा इशाराही किसान सभेतर्फे देण्यात आला आहे.