Vidhansabha : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यभरात पक्षाचे व जनसंघटनांचे मजबूत काम असलेल्या आणि प्रदीर्घ व यशस्वी लढे केलेल्या केवळ १२ जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. इतर डाव्या व पुरोगामी पक्षांनीही आपला प्रभाव असलेल्या मर्यादित जागांची मागणी केली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन याबाबत आपली भूमिका दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केली होती, आणि आपण लढणार असणाऱ्या १२ जागांची यादी या सर्व नेत्यांना तेव्हाच लिखित स्वरूपात सादर केली होती.
महाविकास आघाडीने या १२ जागा माकपला सोडाव्यात व त्यानंतरच उर्वरित जागांच्या बाबत आपसात वाटाघाटी कराव्यात अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली होती. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्ष मात्र माकप व डाव्या पुरोगामी शक्तींना गृहीत धरून जागावाटपाबाबत आपसात चर्चा करत आहेत. इतर डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना अद्याप या प्रक्रियेत सामावून घेण्यात आल्याचे दिसत नाही. महाविकास आघाडीच्या अंतर्गत एकजुटीसाठी हे घातक आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीने लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागा तीन मुख्य पक्षांमध्ये वाटून घेतल्या व त्यानंतर इतर पक्षांच्या बरोबर त्यांचा केवळ पाठिंबा मिळवण्यासाठी चर्चा केली. माकपने तेव्हाही महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांचे हे असे करणे चुकीचे असल्याबद्दल आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आणून दिले होते. किमान विधानसभेच्या जागावाटपात तरी अशा प्रकारे आपसांत तीन पक्षांनी जागा वाटून घेऊन नंतर डावे पुरोगामी पक्ष व संघटनांबरोबर चर्चा सुरू करण्याची चूक होणार नाही याची काळजी घेण्याबद्दल विनंती केली होती. मात्र लोकसभेच्या वेळेस जे झाले तेच विधानसभेच्या वेळेस घडताना आज दिसत आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, इतर डावे पुरोगामी पक्ष व विविध जनसंघटनांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक व महिलांच्या बाबतच्या विविध प्रश्नांवर सत्ताधारी भाजप व त्याच्या मित्रपक्षांच्या विरोधात वर्षानुवर्ष तीव्र संघर्ष केला आहे. जनतेच्या या संघर्षांमधून पुढे आलेल्या मागण्या व डावे पक्ष विविध प्रश्नांबाबत घेत आलेली धोरणे यांचे प्रतिबिंब महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात उमटावे असा आग्रहही पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या शिरस्त नेत्यांकडे लावून धरण्यात आला होता. मात्र याबाबतही कोणताही सकारात्मक प्रतिसाद अद्याप देण्यात आलेला नाही.
दुसऱ्या बाजूला हे प्रमुख तीनही पक्ष वेगवेगळ्या संवाद यात्रा, सभा व प्रसार माध्यमांमधील चर्चेच्या माध्यमातून माकपने व इतर डाव्या पक्षांनी लढवण्यासाठी सादर केलेल्या जागांवर आपले उमेदवार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केंद्रस्थानी आणत आहेत. महाविकास आघाडीतील या तीन पक्षांची ही कृती समन्वयाच्या व एकजुटीच्या प्रक्रियेस बाधा आणणारी आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, विविध जनसंघटना, वर्गीय संघटना, पुरोगामी विचारवंत, पत्रकार, बुद्धिजीवी या सर्वांनी अपार मेहनत घेऊन राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण तयार केले होते. तेव्हा सर्वांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती. परिणामी महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र असे असले तरी महाविकास आघाडी व महायुती मधील मतांचे अंतर पाहता डाव्या शक्ती, विचारवंत, लेखक, विविध जनसंघटना, वर्गीय संघटना यांना दूर ठेवून महाविकास आघाडीला विधानसभा(Vidhansabha)निवडणूक जिंकता येईल असे आकलन करणे अतिआत्मविश्वासाचे ठरू शकते.
देशाच्या जनतेत फूट पाडून जनविरोधी, धर्मांध, जातीय, भ्रष्ट व हुकूमशाही राजकारण करणाऱ्या भाजप व त्याच्या मित्रशक्ती संविधानाला व भारताच्या एकतेला धोका निर्माण करू पाहत आहेत. अशा पार्श्वभूमीवर संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता व भारतीय जनतेच्या हितरक्षणासाठी सर्व लोकशाहीवादी शक्तींची एकजूट अत्यंत आवश्यक बनली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ही एकजूट जास्त बळकट व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकण्याची आवश्यकता आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पार्श्वभूमीवर जाहीर मागणी करतो की विधानसभा (Vidhansabha)निवडणुकीच्या जागा वाटपाच्या प्रक्रियेत महाराष्ट्रातील सर्व डावे व लोकशाहीवादी पक्ष व पुरोगामी संघटनांना महाविकास आघाडीने तातडीने सामावून घ्यावे. निवडणूक लढण्याबद्दल त्यांचे आग्रह अत्यंत प्रामाणिकपणाने विचारात घेतले जाऊन सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. मात्र तसे झाले नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना गृहीत धरणाऱ्यांची असेल.
डॉ. उदय नारकर
राज्य सेक्रेटरी
Vidhansabha
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले