Wednesday, January 15, 2025
HomeNewsसुरगाणा तालुक्यात वीज पंपांची चोरी शेतक-यांची वाढतेय डोकेदुखी

सुरगाणा तालुक्यात वीज पंपांची चोरी शेतक-यांची वाढतेय डोकेदुखी

वांगणसुळे (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यात भुरट्या चोरट्यांनी दुचाकी तसेच शेतक-यांच्या शेतातील विहीर, बोअरवेल, नदी मधील बसवलेल्या वीज पंपाच्या चोरीकडे मोर्चा वळवल्याने शेतक-यांची डोकेदुखी वाढली आहे. तालुक्यात सिंचन क्षेत्र जेमतेम दीड ते दोन टक्के आहे. शेती सिंचना अभावी अनेक शेतक-यांनी बोअरवेल मध्ये वीज पंप बसवून पिण्याचे पाणी उपलब्ध केले आहे. येत्या दोन चार दिवसातच पिंपळसोंड पैकी उंबरपाडा येथील माजी सैनिक शिवराम चौधरी यांच्या शेतातील वीज पंप अज्ञात तरुणांनी चोरुन नेला आहे. पातळी खो येथील बाळू धुम यांचा मोटार पंप चोरट्यांनी लांबविला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चौधरी यांनी आपल्या शेतात चारशे आंब्याची रोपे लावली आहेत. आंब्याच्या रोपांना दीड एच.पी.च्या सिंगल फेज वीज पंप नदीवर बसवून ठिबक केले होते. मंगळवारी रात्री दोन तरुणांनी पंपाची वायर दगडाने ठेचून तोडली व पाईप कापून अज्ञात तरुण चोरट्यांनी पंप लांबवला आहे. त्यामुळे लागवड केलेली चारशे आंब्याची रोपे पाण्या वाचून सुकून, मरुन जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

पंप चोरणा-यांना रात्रीच्या सुमारास उंबरठाण जवळील चिंचमाळ, बर्डा, वांगण (क) या मार्गे दुचाकीवरून रात्री अकरा वाजेच्या सुमारास पंप चोरुन घेऊन जातांना वन कर्मचारी यांनी वांगण बर्डा जवळील बाभळीचा माळ येथे पाहिले होते. मात्र अंधार असल्याने चोरटे ओळखू आले नाहीत. सदर पंप उंबरठाण भागात गेल्याचे समजते. पंप चोरणारी तरुणांची टोळी उंबरठाण, पळसन, बोरगाव, बा-हे, सुरगाणा भागात सक्रिय झाली असून नदीवरील, विहीर, बोअरवेल यामधून चोरटे वीज पंपावर डल्ला मारुन वीज पंपाची चोरी करीत आहेत. भुरटे नवीन बोअरवेल काढलेल्या काही गरजूंना स्वस्तात विकत असल्याचे समजते. तर व्यसनाधिनतेकडे वळलेले तरुण हेच पंप भंगारात विकून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. काही जणांना जुगार, मटक्याचा नाद लागल्याने असा चो-या करून आपली हौस भागवून घेत आहेत.

उंबरठाण भागातील पुर्वी कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर नांद्रे यांची बदली झाल्याने भुरट्या चोरट्यांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याने चोरटे मोकाट सुटले आहेत. पंप चोरुन भंगारात विकून पार्ट्या करीत असल्याची चर्चा शेतक-यांमध्ये आहे. शेतकरी पिंपळगाव भागात द्राक्षे बागेवर कामाला जाऊन पंधरा ते वीस हजार रुपयांचा वीज पंप विकत घेऊन बोअरवेल मध्ये टाकतात. तेथून चोरटे चोरुन घेतात. शेतकरी वारंवार पंप विकत घेऊ शकत नाहीत. चिंचमाळ येथील सार्वजनिक विहीर वरुन दोन पंपाची चोरी झाली होती. पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथून पंप चोरट्यांनी लांबवले आहेत.

तालुक्यात शेती सिंचन अत्यल्प असले तरी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बोअरवेल शेतक-यांनी काढलेले आहेत. उंबरठाण ते बर्डीपाडा या सीमावर्ती भागात अवैध धंदे वाढले असून त्याचा परिणाम तरुण युवकांवर होत आहे. अनेक तरुण हाताला काम नसल्याने भुरट्या चोरी कडे वळले आहेत. नवी, जूनी दुचाकी घेऊन मोकाट सुटले आहेत. पेट्रोल टाकायला पैसे नसले की अशा प्रकारे चोरी करतात.

प्रतिक्रिया-

“तालुक्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. कसेतरी पैशाची जमवा जमव करुन मोटार पंप शेतात बसवितात. निदान पिण्याची टंचाई तरी दुर होते. शेतक-यांना हकनाक त्रास देणा-या भुरट्या चोरट्यांची कदापि गय केली जाणार नाही. शेतक-यांच्या नादाला लागणा-यांचा कायमचा बंदोबस्त करण्यास पोलीस सक्षम आहेत. पंप चोरट्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. शेतक-यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे. निश्चितच तपास करण्यात येईल.”

संदीप कोळी (पोलीस निरीक्षक सुरगाणा)

    प्रतिक्रिया-
    “माझे वय ७५ वर्षाचे आहे. गावात पाणी टंचाई परिस्थिती असल्याने एक किलोमीटरवरून नदीत सिंगल फेज बसवून पाणी आणले होते. तेच पाणी मी शुद्ध करून पिण्यासाठी व जनावरांसाठी वापरत होतो. चोरट्यांनी पंप चोरून घेतल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वय झाल्याने डोक्यावर पाणी आणता येत नाही. चोरटे हे तरुण युवक असतील. जूनी माणसे वीजेला खुप घाबरतात त्यामुळे ते हात लावू शकत नाहीत. सधन भागात शेतामध्ये पंप अहोरात्र उघड्यावरच असतात त्याला कोणीही हात लावत नाहीत. दुचाकी व पंप चोरणा-या तरुणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून शेतकर-यांना त्रास देणा-यांचा बंदोबस्त करावा हिच पोलीस यंत्रणे कडून अपेक्षा.”

    शिवराम चौधरी (माजी सैनिक पिंपळसोंड)

      उंबरठाण गुजरात हद्द, मांधा, गुही, रघतविहीर, कुकूडणे, बर्डीपाडा, पिंपळसोंड, खुंटविहीर या सीमावर्ती भागात पोलिसांनी महिना, पंधरा दिवसातून एकदा तरी गस्त घालून रात्री अपरात्री दुचाकीवरून वाहन चालविण्याचा परवाना नसतांना पंधरा ते वीस वयोगटातील मोकाट फिरणाऱ्या तरुणांना विचारणा करीत वचक, दबदबा निर्माण करावा. अशा भुरट्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे. जर मोटार पंप चोरट्यांना पोलिसांनी वेळीच लगाम घातला नाही तर भविष्यात जल जीवन हर घर पाणी पुरवठा योजनेचे मोटार पंप चोरटे ठेवणार नाहीत ते चोरून भंगारात विकले जातील अशी भीती व्यक्त केली जाते आहे. आता पर्यंत तालुक्यात शंभर पेक्षा जास्त मोटार पंप चोरट्यांनी लांबवले असतील मात्र पोलिसांकडे तक्रार देऊन पण पोलिस यंत्रणेकडून तपास केला जात नसल्याने शेतकरी तक्रार करण्यास टाळाटाळ करतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

      संबंधित लेख

      लोकप्रिय