Tuesday, January 21, 2025

जनमत : पत्रकारिता युवकांसाठी योग्य क्षेत्र – अमोल मांढरे

आजच्या वाढत्या जागतिकीकरणात पत्रकारिता हे युवक वर्गासाठी एक योग्य व आव्हानात्मक क्षेत्र आहे. आज नवनवीन तंत्रज्ञान निर्माण होत आहे. पूर्वी काही अंतर पायी जाणारा माणूस आज सातासमुद्रापार काय तर मंगळावर राहण्याचे स्वप्न बाळगून आहे. आज आपल्या देशात आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, आणि राजकीय क्षेत्रात नवनवीन पर्याय निर्माण होत आहेत. आपली जगाला हेवा वाटणारी भारतीय संस्कृती आणि एकविसाव्या शतकातील नवीन तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालने हे युवकांचे कर्तव्यच आहे. 

आजच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या करिअर मध्ये आज नवनवीन क्षेत्रे त्यांना खुणावत आहेत. यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक, कला, वाणिज्य, अवकाश तंत्रज्ञान, यामध्ये प्राविण्य मिळवून आपली उज्ज्वल करियर करण्यास विद्यार्थी तयार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी व समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी पत्रकारिता या क्षेत्र मधूनच नवीन क्रांती केली. व तीही आज आपल्या समाजासमोर एक आदर्श आहे.

आज वाढत्या आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अगदी एका सेकंदात आपण हजारो किलोमीटर दूरवरच्या व्यक्तीशी क्षणात संपर्क साधू शकतो. आज आपल्या देशात विविध समस्या निर्माण होत आहेत. सध्या टीव्ही चॅनल्सवर अनेक न्यूज चॅनल मध्ये स्पर्धा निर्माण होत आहे. साहाजिकच यामध्ये बऱ्याच प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. तेव्हा विशेषतः आजच्या युवकांसाठी पत्रकारिता हे योग्य व आव्हानात्मक क्षेत्र आहे. उत्तम आर्थिक वेतन, समाजात प्रतिष्ठा व लोक सेवा करण्यासाठी संधी हे लक्षात घेऊन युवकांनी यामध्ये आपले भवितव्य घडवावे. आज न्यूज चॅनल बरोबरच विविध पोर्टल चैनल त्याचबरोबर सोशल मीडियामध्ये विविध बातम्या प्रसारित होत आहेत. याला आपल्या समाजातील विविध स्तरातील लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. त्याचबरोबर समाजातील विविध प्रश्नांचा, नागरिकांच्या प्रश्नांवर अभ्यास करून त्यासाठी पत्रकारिता क्षेत्र हे विद्यार्थ्यांनी निवडणे गरजेचे आहे. 

आपला बळीराजा, वीर जवान, आपल्या महापुरुषांचा आदर्श, परराष्ट्र धोरण विविध सामाजिक व शैक्षणिक समस्या त्याचबरोबर कला, क्रीडा, आरोग्य आणि मनोरंजन अशा विविध विषयात पत्रकारिता क्षेत्रात युवक आपले विचार समाजासमोर मांडू शकतात. विशेषतः विद्यार्थ्यांनी आता चाकोरी बाहेर जाऊन पत्रकारिता हे क्षेत्र निवडणे त्यांच्या व आपल्या समाजासाठी सकारात्मक आहे. अगदी ग्रामीण भागाच्या तळागाळात पासून ते थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पत्रकारिता क्षेत्रात युवकांना नवनवीन संधी निर्माण होत आहेत. तेव्हा युवकांनी गांभीर्याने विचार करून याला एक योग्य संधी समजून पत्रकारिता क्षेत्रात आपले उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे. आज कोरोना संकटामुळे शाळा महाविद्यालय बंद आहेत. परंतु पत्रकारिता क्षेत्रात करिअर करण्यास उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज मोबाईल व संगणक त्याचबरोबर इंटरनेट या नवनवीन माध्यमातून मार्फतही पत्रकारिता क्षेत्रात करिअर करता येणे सहज शक्य आहे. युवकांनी फक्त यास करियर म्हणून न बघता आपल्या समाजासाठी एक आद्य कर्तव्य म्हणून या क्षेत्राकडे पाहणे हे अत्यंत गरजेचे आहे.

आज कोरोना संकटात समाजात अनेक बिकट प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज आपले सर्व पत्रकार बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन आपले कर्तव्य बजावीत आहेत. तेव्हा शासनाने ही पत्रकारांसाठी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. शासनाबरोबरच विविध सामाजिक संस्था, समाजातील जाणकार नागरिक यांनी पत्रकारांच्या उत्कृष्ट कामासाठी आर्थिक व मानसिक पाठबळ देणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपले सर्व पत्रकार बांधव हे त्यांचे कार्य भविष्यातही चालू ठेवतील.

– अमोल मांढरे 

– वाई, जिल्हा सातारा

– 7709246740

Related Articles

- Advertisement -

Latest Articles