सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. सुहास कुलकर्णी व संशोधिका अमृता शेटे मांडे यांच्या संशोधनातून माहिती आली समोर
बार्शी (सोलापूर) : म्युकरमायकोसिसला कारणीभूत ठरलेली बुरशी प्रक्रिया करून प्रयोग शाळेत वाढविण्यात येत असताना, सदर बुरशी नेहमीपेक्षा दिडपट वेगाने वाढत असल्याचे, सूक्ष्मजीव शास्रज्ञ डॉ. सुहास कुलकर्णी व संशोधिका अमृता शेटे मांडे यांनी सांगितले.
बुरशी प्रयोगशाळेत वाढविण्यासाठी ३ ते ४ % साखरेचे प्रमाण, ५ ते ५.५ असा अँसिडीक पीएच (सामू) व २५ ते ३० डिग्री सेंटिग्रेड तपमान हे तीन घटक आवश्यक असतात. हे लक्षात घेऊन बुरशीच्या प्राथमिक वाढीसाठी “समृद्धी पोषक माध्यम” (इन रिचमेन्ट न्युट्रीयंट मेडीयम) वापरले जाते व नंतर पोषक माध्यम वापरून पुढील प्रयोग केले जातात.
या पद्धतीने जेंव्हा आम्ही रुग्णातील क्लिनिकल सॅम्पल मधील बुरशी वाढविण्याचा प्रयोग केला तेंव्हा अत्यंत कमी वेळात बुरशीची वाढ झालेली आढळून आली. नेहमी जेवढी बुरशी वाढायला साधारण ४५ ते ४८ तास लागतात, तेवढयाच प्रमाणात बुरशी वाढायला फक्त ३० ते ३२ तास लागल्याचे या प्रयोगाच्या पाहणीत समोर आल्याचे शेटे मांडे यांनी सांगितले.
साथीच्या काळात रोगकारक जंतूंची संसर्ग क्षमता व वाढीचा वेग वाढलेला असतोच. पण या केलेल्या प्रयोगात बुरशीचा वाढीचा वेग त्याहीपेक्षा थोडा अधिक असल्याचे नोंदण्यात आले आहे. हा वाढलेला वेग, कोविड व मुधुमेह रुग्णामध्ये म्युकर मायकोसिसच्या लागण सहज होण्या संदर्भात चिंता वाढविणारा असल्याचे डॉ. सुहास कुलकर्णी यांनी आवर्जून सांगितले.
या रोगाचा फंगस नाकावाटे प्रवेश करून,सायनस द्वारे डोळे व मेंदू यांना प्रादुर्भाव पोहचवू शकतो. त्यामुळे या फंगसला नाकात किंवा सायनस मध्येच अटकाव करून रुग्णाच्या डोळ्याची व मेंदूची हानी टाळता येऊ शकते.त्यासाठी कोविड रुग्णांची नाकाची तपासणी दर २ ते ३ दिवसांनी तज्ञ डॉक्टरांकडून करून घेणे अनिवार्य करावे, असे डॉ. सुहास कुलकर्णी यांनी मुद्दाम नमूद केले आहे
कोण आहेत संशोधक :
1. डॉ सुहास कुलकर्णी हे निवृत्त प्रोफेसर असून सूक्ष्मजीवशास्रज्ञ व संशोधक आहेत. मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक तसेच मराठी विज्ञान परिषद शाखा बार्शीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे ५०पेक्षा अधिक रिसर्च पेपर्स प्रसिध्द झाले असून १५ नवीन शोध लावले आहेत.
2. अमृता शेटे मांडे या सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासिका असून पीएचडी करत आहेत.