ठाणे : ठाणे – पालघर जिल्ह्यात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे मेळावे संपन्न झाले. मेळाव्यांंना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. तालुक्यानिहाय झालेल्या मेळाव्यात हजारो महिलांनी सहभाग घेतल्याची माहिती जनवादी महिला संघटनेच्या राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर यांनी दिली.
सबंध लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील महिलांना भेडसावणारे विविध प्रश्न आणि ते उचलण्यासाठी जमसंची भक्कम संघटनी केली जात आहे. दरम्यान 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान ठाणे-पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत संघटनात्मक मेळावे घेण्यात आले. जव्हार, विक्रमगड, तलासरी, डहाणू, पालघर, वाडा आणि शहापूर अशा 7 तालुक्यांत झालेल्या या मेळाव्यांना हजारो संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
मेळाव्यांना आलेल्या गावा-पाड्यांतील महिलांनी त्यांना भेडसावणाऱ्या पाणी, रेशन, रोजगार, भरमसाठ आलेली वीज बिले आदी प्रश्नांना घेऊन येणाऱ्या काळात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मेळाव्यात जमसंच्या अखिल भारतीय सरचिटणीस मरियम ढवळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्य सचिव प्राची हातिवलेकर, राज्य उपाध्यक्ष लहानी दौडा आणि राज्य सहसचिव सुनीता शिंगडा तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.