सुरगाणा (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यात शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. अलंगुण परीसरातील अती मुसळधार पावसामुळे अलंगुण, तोरणडोंगरी रस्त्यावर असलेला गावबंधारा ओव्हर फ्लो झाला. गेल्या उन्हाळ्यात या बंधाऱ्यातील गाळ काढून जास्तीत जास्त पाणी साठा करून गाव व परीसरातील शेती तसेच पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था होणार होती, मात्र यावर्षी सलग सहा दिवस रात्र मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.
अलंगुण येथील गावकरी सांडवा मोकळा करीत होते, परंतु संततधार पावसाने पाण्याची पातळी वाढत गेली, दोन फोकल्यंड मशिनच्या मदतीने संततधार पावसात उभे राहून शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते, मात्र सकाळी १० वाजता गाव व नदी शेजारील शेती आणि जीवितहानी होऊ नये म्हणून सांडव्याच्या बाजूची जागा काढून देण्याचे काम चालू होते परंतु जोरदार पावसामुळे धरणातील पाण्याच्या दाब वाढत गेल्याने, मातीचा भराव वाहत गेला असता धरणातून जोरात निघालेल्या पाण्याने अर्धा तास रौद्र रूप धारण केले. पाणी निघून गेल्यावर परिस्थिती पूर्ववत झाली. माञ या अती प्रवाहाने पात्रातील पातळी ओलांडल्याने, नदी किनाऱ्यावरील दोन तीन घरात पाणी घुसले, लाईटचे खांब, झाडे, शेती, किरकोळ अवजारे याचे नुकसान झाले आहे,
सदर घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांची धावपळ झाली. पाण्याचा साठा वाढल्याने आधीच घटनेची दवंडी गावात दिली होती. त्यामुळे नागरिक सतर्क झाल्याने जिवितहानी टळली आहे. गावातील जनजीवन थोड्याफार प्रमाणात विस्कळीत झाले असले तरी जनजीवन पूर्वपदावर आले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम वीज वितरण मार्फत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
सचिन मुळीक – तहसिलदार सुरगाणा
पाण्याचा प्रवाहाचा लोंढा अचानक आल्याने अवघे गावच जलमय झाले. अनेक घरात पाणी घुसल्याने महिला, मुले हि भयभीत होऊन आरडाओरडा, एकच धावपळ सुरु झाली. ओढ्या लगतचे नागरिक भयभीत होऊन गावातील उंचवटा भागावर सुरक्षित स्थळी पोहचल्याने जिवितहानी टळली. घरात पाणी घुसल्याने भांडी कुंडी, कपडे लत्ते, घरगुती सामान, औजारे धान्य, भिजून खराब झाले. लाकडी कौलारू कच्चा भिंतीची घरे पडली. तसेच ग्रामपंचायतीमध्ये पाणी घुसल्याने दप्तर भिजून खराब झाल्याचे बोलले जात आहे. अनेकांच्या घरात पाण्याच्या प्रवाहाने वाहून आणलेला गाळ साचल्याने काढता काढता नाकीनऊ आले. ओढ्याच्या काठावरील घरात दहा ते बारा फुट पाणी छपरा पर्यंत आले होते. या प्रवाहामुळे भातशेती बरोबरच शेतातील बांध, भाताची आवण यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील विजेचे खांब कोसळले आहेत. ओढ्याच्या काठावरील झाडे, झुडपे उन्मळून पडली आहेत. गावात वाहून आलेल्या गाळामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. गाळ हटविण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने दिवसभर सुरु होते. हिच दुर्घटना रात्रीच्या वेळी झाली असती तर अनेकांना जीव गमवावा लागला असता.
बंधारा फुटल्याची माहिती मिळताच तहसिलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी दिपक पाटील, पोलीस निरीक्षक सचिन कोळी, नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातील अधिकारी यांनी अलंगुण येथे घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी करीत ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.