Sunday, December 8, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषरविवार विशेष लेख : रणधुमाळी पश्चिम बंगाल निवडणूकीची - विशाल पेटारे

रविवार विशेष लेख : रणधुमाळी पश्चिम बंगाल निवडणूकीची – विशाल पेटारे

करोना महामारीच्या धुमाकूळानंतर पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू, पडूचेरी या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहे. देशातील इतर राज्यात करोना रुग्णांमध्ये वाढत होत असताना निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये, राजकीय पक्षांच्या सभांमध्ये करोनाचा शिरकाव होत नाही हे विशेष. असो, 

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू, पडूचेरी या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय मीडियाने आपले संपूर्ण लक्ष पश्चिम बंगालवर केंद्रीय केले आहे. या पाच राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगाल ही २९४ जागा असणारी सर्वात मोठी विधानसभा आहे. असे असले तरी या राज्याचा राजकीय इतिहास फार मोठा आहे. या राज्याच्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि डावे+काँग्रेस + सेक्युलर फ्रंट (संयुक्त मोर्चा) मैदानात आहे. या तीन आघाड्या मैदानात असल्या तरी ही राजकीय लढाई भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांमध्येच होणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक मांडतात. डावे आणि काँग्रेस या निवडणुकीत कुठेच नसल्याचे टीका देखील होत आहे.

संपूर्ण देशाचे नंदीग्राम या विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष लागलेले आहे. कारण ममता बॅनर्जी नंदीग्राम या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात भाजपचे शुभेंदु अधिकारी उभे आहेत, अधिकारी हे नंदीग्रामचे विद्यमान आमदार आहेत. नंदीग्राम जो जिंकेल, पश्चिम बंगाल तो जिंकणार अशी देखील चर्चा पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजपकडून येथे मोठी ताकद लावली जात आहे. असे असले तरी भाजप जाणूनबुजून अनेक निवडणुका या प्रतिष्ठेच्या असल्याचे वातावरण निर्माण करत असते.

निवडणुकांची रणधुमाळी उडाल्या नंतर ममता बॅनर्जी नंदीग्राम भागात निवडणूक प्रचारासाठी गेल्या असता त्यांच्यावर सुनियोजित हल्ला झाल्याचा आरोप ममता यांनी केला होता. मात्र भाजप, काँग्रेसने याला राजकीय स्टंट असल्याची टीका केली होती. ममता यांच्या पायाला प्लॅस्टर केल्यानंतर त्यांना दवाखान्यातून सोडण्यात आले त्यानंतर ममता यांनी रणरणत्या उन्हात व्हीलचेअर वरून रोड शो करत प्रचार केला आहे. त्यांच्यावरील हा हल्ला खरोखरचा असो किंवा स्टंट यामध्ये त्यांना जनतेकडून सहानुभूती मिळाली आणि त्याचा त्यांना निश्चित फायदा झाला हे नाकारता येत नाही.

या निवडणुकीत धार्मिक राजकारण देखील मोठ्या प्रमाणात खेळले गेले. जय श्रीराम ते आपणच कसे कट्टर हिंदू हे सांगण्यापर्यंत शर्यत लागली होती. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी मी हिंदू ब्राम्हणाची मुलगी आहे. तुमच्यापेक्षा जास्त हिंदू धर्म जाणते. असे म्हणत बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली होती. तर भाजपकडून “जय श्रीराम”च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. तसेच मुस्लिम मतदारांना देखील तुमच्या मताचे विभाजन होऊ देऊ नका असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले होते. तर भाजप कडून आणखी काही दिवस तृणमूलची सत्ता राहिली तर राज्यात हिंदूंचे मंदिर राहणार नाही असेही म्हटले होते. तसेच लोकशाहीला धक्कादायक ठरतील असे ही अनेक प्रकार घडले आहेत, तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅड देखील सापडले होते तर आसाममध्ये भाजप नेत्याच्या गाडीतून ईव्हीएम घेऊन जाताना गाडी पकडण्यात आली होती.

निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना अनेक झटके बसले आहेत अनेक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांनी ममता बॅनर्जींना धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामध्ये त्यांचे काही जुने साथीदारही भाजपमध्ये गेले. तृणमूलला टक्कर देण्यासाठी भाजपने जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मैदानात उतरवले तर तृणमूलने अभिनेत्री आणि राज्यसभेवरील खासदार जया बच्चन यांना स्टार प्रचारक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आपल्या पहिल्याच भाषणामध्ये त्यांनी स्वतः किंग कोब्रा या विषारी साप असल्याचे म्हंटले तर जया बच्चन यांनी मतदारांना प्रभावित करत तृणमूलचा जोरदार प्रचार केला.

निवडणूका आहेत आणि राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य होणार नाही असे कधी होत नाही. या निवडणुकीत सुद्धा अनेक नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केले गेले, यामध्ये “भारतीय ३० टक्के मुसलमान एकत्र आले तर भारतात चार नवे पाकिस्तान निर्माण होऊ शकतात, मग ७० टक्क्यांबाबत बोलतात ते कुठे जाणार” असे देखील वादग्रस्त वक्तव्य प्रचारा दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नेत्याकडून करण्यात आले होते. “ममता यांनी साडी नव्हे बरमुडा परिधान करावा” असे भाजप नेते दिलीप घोष यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर काँग्रेस, डावे संयुक्त मोर्चाची ब्रिगेड मैदानावर लाखोंची सभा झाली, या अगोदरही डाव्यांच्या अशाच सभा झालेल्या आहेत मात्र त्याचे मतांमध्ये रूपांतर होणार का की, महाराष्ट्रातील राज ठाकरेंच्या सभांसारखे “कपिल शर्मा शो होणार” हे पाहावं लागणार आहे. त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हुगली येथे होणाऱ्या दोन प्रचारसभा गर्दी नसल्यामुळे रद्द कराव्या लागल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे.

पश्चिम बंगालला मोठा राजकीय हिंसाचाराचा इतिहास आहे. यामुळे राज्यात शांततेत आणि निःपक्षपाती निवडणुका घेणं हे मोठं आव्हान निवडणूक आयोगासमोर असतं. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा हिंसाचारातून पश्चिम बंगाल सुटलेला नाही. निवडणूक प्रचारपासून ते मतदानापर्यंत अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. उभे असलेल्या १७१ उमेदवारांपैकी २५ टक्के उमेदवारांविरोधात गुन्हेगारी खटले सुरू आहेत.

ज्यांनी पश्चिम बंगालवर सलग ३५ वर्षे राज्य केलं त्या डाव्यांना आज पश्चिम बंगालमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवणे हेच मोठे आव्हान आहे. डावे आणि काँग्रेस ही निवडणूक आघाडीमध्ये लढवत आहे. त्यामध्ये काँग्रेस ९१ तर डावे १७५ जागा लढवत आहे. मागील २०१६ च्या विधान सभेच्या निवडणुकीचा विचार करता डावे काँग्रेस आघाडी ही तृणमूल काँग्रेसला टक्कर देऊ शकली नाही. 

मागील निवडणुकीमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला २९० पैकी सर्वाधिक २११ जागा निवडून पश्चिम बंगाल मधील सर्वात मोठा पक्ष बनवला होता त्या खालोखाल काँग्रेस ४४, डावे ३२ तर भाजप ३ अशा जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत डाव्यांनी तरुणांना मोठी संधी दिली आहे, ४० पेक्षा कमी वय असणाऱ्या उमेदवारांची संख्या ५० टक्के पेक्षा जास्त आहे, मात्र याचा निवडणुकीमध्ये किती फायदा होईल हे वेगळंच सांगू शकेल परंतु सी वोटरने लावलेल्या ओपिनियन पोलनुसार या वर्षी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या १६० जागा निवडून सत्ता स्थापन करणार असा निष्कर्ष सी वोटरने लावला आहे. त्यामध्ये भाजप ११२ तर संयुक्त मोर्चा २२ जागा जिंकेल असा अंदाज लावला आहे. त्यामुळे ओपोनियन पोल आणि पश्चिम बंगालचा मूड पाहता मोदी मॅजिकने तृणमूल काँग्रेसची पळता भुई केली हे नक्की.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते डझनभर केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचाराचे रान उठवून दिले मात्र या मध्ये काँग्रेसचे कुठेही दिसली नाही. या निवडणुकीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी वा प्रियांका गांधी ही काँग्रेसची बडी मंडळी पश्चिम बंगाल मध्ये फिरली देखील नाही. या अगोदर बिहारमध्ये देखील राम भरोसे असणाऱ्या काँग्रेसचा तोटा इतर पक्षांना सहन करावा लागला. याही निवडणुकीत काँग्रेसचा बार फुसका ठरण्याची शक्यता आहे.

– विशाल पेटारे

– रानडे इन्स्टिट्यूट, पुणे

संबंधित लेख

लोकप्रिय