पुणे : साहित्यिक सुदेश इंगळे यांची कविता डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी ए/ बी एससी/बी कॉम द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. ‘उगाच काहीतरी’ या अक्षर मानव, पुणे प्रकाशित कवितासंग्रहातील ही रचना असून आदिम मानवी दुःख-अस्वस्थता आणि भविष्याविषयी ही कविता भाष्य करते.
सुदेश इंगळे यांचे उगाच काहीतरी (२०१५), काळया ठिपक्यांचं सोनेरी काळवीट (२०१८) निम्म्या रेषांचा अपरिग्रह (२०२०) हे तीन कवितासंग्रह प्रकाशित असून “…अन् माझा खापर ढापर mRNA” हा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली कविता
मला तो परत भेटला…
मला तो परत भेटला,
अगदी त्याच्या भळभळणाऱ्या जखमेसहीत …
तसा तो याआधीही
अनेकांना भेटलाय म्हणा !
हाडांच्या सापळ्यात
हातभर दाढीची
रक्ताळलेली लक्तरं टांगल्यासारखा…
उजाड, उद्ध्वस्त
तरीही जाणिवांच्या प्रत्येक चक्रव्यूहाला भेदणारा,
हजारो वर्षांपासून
श्वापदांसारखा
भयाण दऱ्यांत जखमा सावरणारा…
….तोच अश्वत्थामा!
हृदयातून झरणाऱ्या
हर एक वेदनेत,
जिभेला हासडे देणाऱ्या कालिदासाच्या वंचनेत,
सत्याच्या अढळ निष्ठेसाठी
जहरी प्याले पिणाऱ्या सॉक्रेटिसात
किंवा
सोनेरी किरिटाच्या मांदियाळीतून रिकामं मरणाऱ्या सिंकदरात भेटतो
…..ठणकणारा अश्वत्थामा!
अशी कित्येक करुण रूपं सिध्दार्थाला दिसली असतील,
परित्राणाच्या हजारो शपथांनंतर जन्म घेणाऱ्या
माझ्या शककर्त्या राजास तो भेटला असेल,
दक्षिणेश्वरीच्या गूढ देवळांत साधुत्वाच्या प्रगाढ कामनेतही असेल
………खदखदणारा अश्वत्थामा!
हातभर पांढऱ्या दाढीतला लिओसुध्दा
सुखाची गुपितं लिहिलेली फांदी शोधणारा,
क्रांतीच्या शिखरावरची
HSRA ही तशीच
अन् तिचे शिलेदारही,
सूर्याच्या लाह्या खाण्यासाठी
हट्ट करणारा मी
अन् माझी स्वप्नंही तशीच….
अश्वत्थामे… अस्वस्थ आत्मे !
प्रवाही जखमांच्या संवेदना
आणि
दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या
शाली लपेटलेल्या फौजा असोत
अथवा
पांगुळगाड्यावर रेंगाळणाऱ्या शैशवांच्या छटा,
चराचरात त्याला पाहणाऱ्या माझ्या रक्तांध नजरांतही तोच झुरतोय….
…..भळभळणारा अश्वत्थामा!
- सुदेश इंगळे
(उगाच काही तरी)
हे ही वाचा :
मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी घेतला महत्वाचा निर्णय
ब्रेकिंग : घोडेगाव येथे भीमाशंकर-कल्याण बसचा अपघात, बस पुलावरून पंधरा ते वीस फूट ओढ्यात कोसळली
पाच वर्षे कुठे होतास म्हणत महिलेने लगावली थेट आमदाराच्या कानशिलात
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणे काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी
सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तींच्या वारसांना परिवहन महामंडळातर्फे मदत जाहिर
केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; ED संचालक संजय मिश्रा यांची मुदतवाढ बेकायदा
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती
राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी
BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती