नवी दिल्ली : भारतात गेल्या काही महिन्यांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता, आता हळूहळू कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असून काही राज्यातील जीवनमान पूर्वपदावर येत आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे, असे असताना भारतातून पळून जाणाऱ्या स्वयंघोषित संत नित्यानंद याने दावा केला आहे की, “जर मी भारत भूमीवर पाऊल ठेवले तर कोरोना महामारी पळून जाईल”.
प्रवचना दरम्यान एका शिष्याने नित्यानंदला विचारले की, भारतातून कोरोना कधी जाईल, त्यावर उत्तर देताना नित्यानंदने म्हटले की, माझ्या शरिरात देवाच्या आत्म्याने प्रवेश केला आहे. जेव्हा मी भारत भूमीवर पाय ठेवतील. त्यावेळी अपोआप कोरोना पळून जाईल, असा हास्यास्पद दावा केला आहे.
स्वयंघोषित संत नित्यानंद याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत. यासंदर्भात २०१९ मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे, तो भारत सोडून फरार झाला आहे. पळून गेलेल्या नित्यानंदने अमेरिकेच्या जवळ एक बेट खरेदी केले असून त्याला हिंदू राष्ट्र (देश) म्हणून घोषित केले आहे. त्या देशाचे नाव कैलासा असे ठेवण्यात आले आहे. या देशाचे स्वतंत्र संविधान असून त्यांचा पासपोर्ट देखील असल्याचा मीडिया रिपोर्ट आहे.