Saturday, May 18, 2024
Homeराज्यअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू, आजपासून असे असणार आंदोलनाचे टप्पे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू, आजपासून असे असणार आंदोलनाचे टप्पे

पुणे : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, मानधनात भरीव वाढ, मासिक पेन्शन, ग्रॅच्युइटी, नवीन मोबाईल, इंधनाचे दर व भाड्यात वाढ, आहाराच्या दरात वाढ आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पुकारलेल्या बेमुदत संपाला आज सुरूवात झाली. संपाला राज्यभरात १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात विविध कार्यालयांवर मोर्चे, निदर्शने करत सरकारचे लक्ष वेधले. सरकारला निवेदने, पत्रव्यवहार आणि इशारा देऊनही मागण्यांवर विचार न झाल्याने आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू झाला आहे.

संपाची नोटीस राज्य शासन, सचिव, आयसीडीएस आयुक्त, सर्व जिल्हा परिषदा, प्रकल्प अधिकारी या सर्वांना कृती समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे. घटक संघटनांनी आणि स्वतः अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी विविध ठिकाणी मोर्चे काढून स्थानिक पातळीवर नोटीस देखील दिल्या आहेत. कामगार संघटना कायद्यानुसार या कायद्याअंतर्गत नोंदित कामगार संघटनांनी नोटीस बजावल्यावर त्यांचे सर्व सभासद त्यात समाविष्ट असतात. प्रत्येक सभासदांनी वैयक्तिक पातळीवर प्रशासनाला काहीही लेखी देणे आवश्यक नाही, असेही कृती समितीने म्हटले आहे.

● आंदोलनाचे टप्पे पुढीलप्रमाणे : 

१. पहिल्या आठवड्यात प्रकल्प, जिल्हा पातळीवर आक्रमक आंदोलन करणार.

२. आमदार, खासदार, मंत्री यांना मोर्चा काढून निवेदन देणार.

३. २८ फेब्रुवारी पासून अंगणवाडी कर्मचारी मुंबईत ठाण मांडणार.

४. केंद्र सरकारच्या बजेट मध्ये अंगणवाडी कर्मचारी व लाभार्थ्यांना काहीच न मिळाल्याने तीव्र निषेध करणार.

५. राज्य सरकारने बजेट मध्ये भरीव मानधनवाढ, नवीन चांगला मोबाईल, पेन्शन यासाठी तरतूद करण्याची मागणी सर्व पातळ्यांवर लावून धरणार.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय