अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यातील कोतुळ जवळील मौजे सोमलवाडी व गंभिरवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या नविन इमारतीचे बांधकाम अतिशय धिम्या गतीने चालू आहे. या संदर्भातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या मागील दोन महिन्यापासून कामाला प्रत्यक्ष सुरुवात होऊन देखील ठेकेदाराने फक्त भिंती उभारल्या आहेत. तसेच भिंतींना वेळेवर पुरेसे पाणी मारले जात नाही. तसेच कोणाची देखरेखही नाही.
सोमलवाडी गावचे सरपंच हे देखील या कामाकडे कानाडोळा करत आहेत, असे काही ग्रामस्थ यांनी सांगितले. ठेकेदार हा उडवाउडवीची उत्तरे देऊन गावकऱ्यांना शांत करत आहे. तरी प्रशासनाने लक्ष घालून चांगल्या दर्जाचे काम व्हावे अशी मागणी येथील गावकरी करत आहेत.
ग्रामपंचायत इमारतीचे काम अंदाजे १५ लक्ष रुपये किंमतीचे आहे. तरी ग्रामपंचायतीचे काम चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे, अशीही मागणी ग्रामस्थ करत आहेत.