पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत यावेळी शिवसेनेचा महापौर बसवायचाच हे ध्येय ठेवून शिवसेना कामाला लागली आहे. आगामी मनपा निवडणूकीत शिवसेनेचे पन्नास नगरसेवक निवडून आणण्यासाठी वातावरण चांगले आहे. पंच्चावन्न आमदारांवर सेनेचे मुख्यमंत्री झाले त्याप्रमाणे पन्नास नगरसेवकांवर पिंपरी चिंचवडचा महापौर करुन दाखवू. मागील पाच वर्षापुर्वी भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त पिंपरी चिंचवड अशा घोषणा दिल्या होत्या. पण या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा अंत झाला नाही, तर हा राक्षस जास्त वाढताना दिसत आहे. हाच मुद्दा घेऊन मनपाची निवडणूक शिवसेना लढेल असे प्रतिपादन शिवसेनेचे पश्चिम आणि पश्चिम उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख खासदार संजय राऊत यांनी केले.
शिवसेनेचे पश्चिम आणि पश्चिम उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख खासदार संजय राऊत यांची चिंचवड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, राज्य संघटक गोविंद घोळवे, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, सह संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड योगेश बाबर, इरफान सैय्यद, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शैला खंडागळे, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, अनंता को-हाळे, धनंजय आल्हाट, गटनेते राहूल कलाटे आदी उपस्थित होते.
यावेळी खा. राऊत पुढे म्हणाले की, शहर कसं चालवायचं हे आम्ही दाखवून देऊ की. भय आणि भ्रष्टाचार मुक्त शहर करुन लोकांना आधार वाटेल अशा पध्दतीने शहर चालवून लोकांना दिलासा देऊ. नागरीकांना वाटलं पाहिजे की, शिवसेना आपली आहे. पिंपरी चिंचवड मनपात एक हाती भाजपाची सत्ता म्हणजे ती सूज आहे. भाजपामध्ये आता असणारे नगरसेवक हे मुळचे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आहेत. ते निवडणूकीत पुन्हा बेडूक उड्या मारतात. इथले प्रमुख सगळे ठेकेदारीच्या लिंकमध्ये आहेत. पण शिवसेनेचा हा धंदा नाही. ज्या पध्दतीने इतर शहरात शिवसेनेच्या महापौरांनी काम केले तसे काम येथेही करु. महाराष्ट्रात आघाडी आहे. पण सन्मानाने जागा वाटप झाले तर येथेही आघाडी होईल. पण याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे मुख्यमंत्र्यांकडे आली आहेत. आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा पत्ता सीबीआय, ईडीकडे नाही का ? असा प्रश्न खा. राऊत यांनी उपस्थित केला. पिंपरी चिंचवड मध्ये सुरु असणारा घाणेरडा भ्रष्टाचार म्हणजे जनतेच्या पैशाची लूट आहे. यावर मुंबईत बसणा-या भाजपाच्या नेत्यांनी बोलले पाहिजे. भाजपाच्या नेत्यांना सत्य आणि त्यांच्यावर केलेली टिका सहन होत नाही. याला राजकारण म्हणत नाहीत. केंद्रिय तपास यंत्रणेचा वापर भाजपा सुडबुद्दीने करीत आहे. हे महाराष्ट्राचे राजकारण बिघडवले जात आहे. हि एक प्रकारे दहशतच आहे. या देशात अशा प्रकारची दहशत करणा-या नेत्यांचे नामो निशाण संपले आहे. हे केंद्रिय यंत्रणेची प्रतिष्ठा कमी केल्यासारखे आहे. केद्रांत सहकार खाते निर्माण केले आहे.
यावर बोलताना खा. राऊत म्हणाले की, जर सहकार खात्याचा वापर महाराष्ट्राच्या सरकारला, सहकार चळवळीला त्रास देण्यासाठी हे खाते निर्माण केले असेल तर त्याचा आम्ही योग्य वेळी कार्यक्रम करु. नारायण राणे यांची राजकीय गरुडझेप शिवसेनेतून झाली. त्यांना योग्य खाते मिळाले नाही. परंतू ते ज्या खात्याचे मंत्री असतील त्याचे ते चांगले काम करतील असेही खा. राऊत म्हणाले.