Saturday, May 4, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषसावित्रीबाई फुले : आद्य क्रांतिकारी 

सावित्रीबाई फुले : आद्य क्रांतिकारी 

सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका तर हॊत्याच पण त्या स्त्रीमुक्तीच्या आद्य प्रणेत्या, पहिल्या कवयित्री आणि सामाजिक राजकीय भान असलेल्या एक थॊर कार्यकर्त्या व विचारवंत होत्या. १९व्या शतकातील समाजाने, विशॆषत: स्त्री शूद्रादिकांनी पेशवाईच्या ब्राह्मणशाहीची कितीतरी अन्यायी रूपे पाहिली व झेलली हॊती. त्यांच्यावर अमानुष अत्याचार करणाऱ्या या ब्राह्मणी उच्चवर्णीय परंपरांच्या आणि त्यांचे मुखंड असलेल्या समाजघटकांच्या प्रतिगामी विचारसरणी आणि व्यवहारांविरूध्द अनेक समाजसुधारकांनी ठाम भूमिका घेतली हॊती. मात्र महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचे नाव त्या सर्वांच्या अग्रभागी घ्यायला हवे. केवळ महात्मा जोतिबा फुले यांची अर्धांगिनी म्हणून नव्हे तर त्यांनी अंगिकारलेल्या समाजपरिवर्तनाच्या कार्याला आपल्या समर्थ हस्तक्षेपातून अधिक कणखर करणा-या सावित्रीबाईंचे कार्य विसरून चालणार नाही.  

एकोणिसाव्या शतकात मध्यायुगाचा वारसा अजून सांगणाऱ्या चालीरीती फार बळकट होत्या. समाजात प्रचंड अंदाधुंदी माजली होती. राजकीय, सामाजिक जीवनातील सत्तेच्या जागा ब्राह्मणांनी बळकावलेल्या होत्या. सावकारी पाशांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मानेभोवती फास टाकला होता. शूद्रातिशूद्र जातींमधल्या स्त्रियांना आणि त्यांची बंधने झुगारून देणाऱ्या ब्राह्मण स्त्रियांना गुलाम म्हणून विकण्यासाठी दासीबटकींचे बाजार भरवले जात असत. अतिशूद्रांना तर गावाच्या जवळही राहू दिले जात नसे. त्यांना उच्चवर्णियांच्या रस्त्यांवरून चालायची परवानगी नसे. गळ्यात मडके व कमरेला झाडू बांधायला लावीत असत. इतकेच काय तर त्यांची सावली देखील उच्चवर्णियांच्या अंगावर पडू नये म्हणून त्यांना वेगळ्या वाटेने जावे लागे. त्यांना स्वयंपाक केवळ गाडग्यामडक्यातच करता येई. अतिशूद्र स्त्रियांना कॆवळ कथलाचे दागिनेच घालायची परवानगी होती. त्यांना अखंड लुगडे देखील नेसायची परवानगी नव्हती. अशा अनेकानेक अन्याय्य प्रथा पेशवाईत चालू होत्या. समाजात एकूणच पितृसत्ताक विचार व व्यवहार रूजलेला होता. सतीसारख्या अनॆक चाली होत्या, स्त्रियांना व शूद्रातिशूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. विधवा विवाहाला बंदी होती. आपले शील शुध्द आहे हे सिध्द करण्यासाठी उकळत्या तेलात हात बुडवणे, दिव्य करणे, निखारे हातात धरायला लावणे अशा अमानुष चाली होत्या. जातींच्या शुध्दतेसाठी स्त्रियांवर अनेक निर्बंध लादले होते. स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांना “पापयोनी” असे संबोधले जाई. शिक्षण व ज्ञान यांपासून त्यांना वंचित ठेवण्यासाठी उतरंडीची जातीव्यवस्था व गतजन्मातील पापपुण्याच्या हिशोबांचे भयगंड गळी उतरवण्याचे काम भटबामणवर्ग आपल्या पुराणातल्या कथांमधून करीत असत. त्यामधून त्यांच्या मनांवरील सारी तथाकथित संस्कारांची पुटे अधिकच दृढ होत. 

१८१८ इंग्रजी सरकारचा अंमल सुरू झाला. स्त्रिया आणि दलितांच्या प्रगतीसाठी शिक्षण प्रसाराचे कार्य, अमानुष चालींवरील बंदी, विवाहविषयक सुधारणा इत्यादि बाबी समाजपरिवर्तनासाठी महत्वाच्या ठरल्या. महात्मा फुलेंसारख्या समाजसुधारकाने अचेतन पडलेल्या समाजाच्या तनामनात जातीअंताचा लढा पुकारून नवे प्राण फुंकले.  

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव इथे झाला. अवघ्या नऊ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह जोतिबांशी झाला. त्यावेळी वराचे वय होते फक्त तेरा. मग स्त्रीशिक्षणाचे व्रत हाती घेतलेल्या फुलेंनी त्या कामाला आपल्या घरातच सुरवात केली. सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर तर केलेच. मळ्यातल्या मातीवर रेघोट्या ओढून सावित्रीबाई बाराखडी, आकडेमोड शिकल्या. पानेफुलेफळे मोजीत शंभर पर्यंतचे पाढेदेखील शिकल्या. मग शब्दरचना, लेखनाचे नियम, व्याकरण आत्मसात केले. आपण पुरुषांप्रमाणे शिकू शकतो, काही काम करू शकतो हा जबरदस्त आत्मविश्वास त्यांना आला. जोतीरावांनी सावित्रीला पूर्ण शिक्षण दिले. पुण्यातील नॉर्मल स्कूलच्या मिसेस मिचेल आणि मेरी जॉन यांनी त्यांची परीक्षा घेतली. त्यात त्या उत्तीर्ण झाल्या. नंतर त्यांनी दोन वर्षात शिक्षिकेचा कोर्सही पूर्ण केला. सावित्रीबाईंच्या कार्याचा एक नवा अध्याय सुरू झाला.  

अज्ञान आणि रूढीग्रस्त स्त्रीला माणूस म्हणून जगायचे असेल तर त्यांना शिक्षण देणे हाच एकमेव उपाय आहे असा क्रांतिकारी विचार करून सावित्रीबाई आणि फुलेंनी १ जानेवारी १८४८ साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली व भारतात स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. भिडे या सुधारणावादी ब्राह्मण व्यक्तीने त्यांना भाडे न घेता जागा देऊ केली. त्यानंतर सावित्रीबाई व फुलेंनी पुढच्या चार वर्षात मुलामुलींसाठी व अस्पृश्यांसाठी एकूण अठरा शाळा चालू केल्या. धर्माभिमानी भटबामण येताजाता वाटेल त्या शिव्या देऊन सावित्रीबाईंवर आगपाखड करत. त्यांना धर्मद्रोही, देशद्रोही ठरवत. सावित्रीबाईंना वेडी, नादान, धर्मबुडवी म्हणत. चिखल व शेणगोळ्यांचा मारा देखील करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. एकदा तर वाटेत अडवून अतिप्रसंगाची धमकीही दिली. सावित्रीबाईंनी न डगमगता त्या गुंडाच्या मुस्कटात भडकावल्या. पण या साऱ्या गदारोळात त्यांनी आपले काम मात्र सोडले नाही. जोतिबांनी चालवलेल्या कार्याला ‘लोक काय म्हणतील’ या विचारांनी घाबरून एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना घर सोडून जा असे सांगितले. पण ते पतिपत्नी मागे हटले नाहीत. सावित्रीबाईंच्या भावाने त्यांना एक पत्र लिहून त्यांच्या कामाबद्दल त्यांना खूप दूषणे दिली. “तुम्ही उभयता महार, मांगांसाठी जी कामे करता ती पतित असून आपल्या कुळाला बट्टा लावणारी आहेत. यास्तव सांगतो की तुम्ही जाती रूढीस अनुसरून व भट सांगेल त्याप्रमाणे आचरण करावे.” मात्र सावित्रीबाईंनी त्याला कडक शब्दात लिहिले, “भाऊ तुझी बुध्दी कोती असून भट लोकांच्या शिकवणीने दुर्बल झाली आहे.” 

महात्मा फुले व सावित्रीबाईंना मूल नव्हते. पण पुनर्विवाहाचा, दुसऱ्या लग्नाचा विचारही फुलेंच्या मनाला शिवला नाही. यापुढे जाऊन फुले दांपत्याने बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. कुटुंबातील जवळच्याच पुरुषांनी अत्याचार केलेल्या, फसवलेल्या व नाडलेल्या शंभराहून अधिक विधवांची बाळंतपणे या उभयतांनी चार वर्षात केली. बालकांची व त्यांच्या आयांची त्यांनी मायेने काळजी घेतली. अशाच एका नाडलेल्या ब्राह्मण स्त्रीच्या मुलाला त्यांनी दत्तकही घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. त्याला डॉक्टर केले. आपल्या घरातील पाण्याचा हौद त्यांनी तत्कालीन अस्पृश्यांसाठी खुला केला व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम ही केला. विधवा ब्राह्मण स्त्रियांचे केशवपन करण्याच्या चालीविरूध्द त्यांनी पुण्यातील न्हाव्यांचा संप पुकारला. हा भारतातील पहिला संप! त्यामागचे सामाजिक कारण पाहिले तर आजही आपण थक्क होतो. आंतरजातीय विवाहासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार पुढे डॉ. आंबेडकरांनी पुकारलेल्या जातीअंताच्या लढ्याची ऐतिहासिक सुरवात दाखवतो. 

महात्मा फुलेंनी १८७३ साली सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाची सर्व धुरा त्यांनी फुलेंच्या १८९० साली झालेल्या मृत्यूनंतर आपल्या खांद्यांवर घेतली. १८९३ साली सासवड या गावी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन भरले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भटाबामणांना बजावले. “गोरे लोक हिंदू नसतानाही त्यांच्या शेजारी बसून पावरोटी मटामट खाण्यात धन्यता मानता आणि महारमांगांची सावली पडली तर विटाळ झाला असे मानता! याला धर्माचे ज्ञान म्हणता येत नाही!”

एक कवी व लेखक म्हणूनही सावित्रीबाईंचे लिखाण स्पष्टवक्ते आणि मार्गदर्शक आहे. ’काव्यफुले’ आणि “बावन्नकशी सुबोधरत्नाकर” या पुस्तकांमधील त्यांच्या कविता इंग्रजी सत्ता, इंग्रजी भाषा, महारमांगांची दारूण स्थिती याविषयांवर प्रखर झोत टाकतात. “विद्ये विना गेले वाया गेले पशू/ स्वस्थ नका बसू विद्या घेणे” हा त्यांचा संदेश आहे. त्यांनी जोतिबांची भाषणेही संपादित केली आहेत. 

म. जोतिबांच्या मृत्यूनंतर या बहादर स्त्रीने जननिंदेची पर्वा न करता त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. आजही हे धाडस किती स्त्रिया करतील? पुण्यात १८९७ साली प्लेगची साथ आलेली असताना जिवाची पर्वा न करता त्यांनी व डॉ. यशवंतने प्लेगच्या रुग्णांची अविरत सेवा केली. त्यातच त्यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी ही क्रांतिज्योत अनंतात विलीन झाली. समाजाला प्रेरणा देण्याचे बळ देण्याचे असामान्य कर्तृत्व असलेली ही खंदी कार्यकर्ती पुढच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ती देत राहील, हे नक्की.

डॉ. माया पंडित

(लेखिका, हैदराबाद येथील ईफेल विद्यापीठाच्या माजी प्र-कुलगुरू आहेत.)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय