Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणकरणीची भीती दाखवून कुटुंबकलह निर्माण करणार्‍या आरग येथील मांत्रिक गौराबाईंचा सांगली अंनिस...

करणीची भीती दाखवून कुटुंबकलह निर्माण करणार्‍या आरग येथील मांत्रिक गौराबाईंचा सांगली अंनिस कडून भांडाफोड !

मिरज ग्रामीण पोलीस आणि सांगली अंनिस यांची धडक कारवाई

सांगली : करणीची भीती दाखवून कुटुंबकलह निर्माण करणार्‍या आरग येथील मांत्रिक गौराबाईंचा सांगली अंनिस कडून भांडाफोड करण्यात आला.

‘तुमच्या सासूने तुमच्यावर करणी केली आहे, त्यामुळे तुम्हास त्रास होतो,’ असे सांगून जादूटोण्याचे उपचार करण्यास प्रवृत्त करणार्‍या व हे न केल्यास वाईट परिणाम होतील, अशी भीती घालून एका प्रतिष्ठित कुटुंबातील विवाहितेच्या कुटुंबात कलह माजविणार्‍या गौराबाई नाईक (पोरे मळा, आरग, ता. मिरज) या मांत्रिक बाईच्या विरोधात पीडित महिलेने सांगली अंनिसकडे तक्रार दाखल केली होती. या मांत्रिक बाईने या पीडित महिलेस करणी काढण्यासाठी विशाळगड, सौंदत्ती येथे दैवी उपचारासाठी फिरविले. 

पीडित महिलेच्या सासरच्या घरातून करणीच्या वस्तू काढण्याचे ढोंगही केले. हे सर्व करताना मांत्रिक बाईने पीडित महिलेकडून अनेकवेळा पैसे, महागड्या वस्तू उकळल्या. मांत्रिकबाईच्या सल्ल्याने पीडिता वागत असल्याने तिच्या कुटुंबामध्ये कलह निर्माण झाला. याचा एकूण परिणाम म्हणून पीडितेच्या नवर्‍याशी वितुष्ट येऊन तिला तिच्या कुटुंबातून एका मुलीसह बाहेर पडावे लागले.

मांत्रिकबाईकडून पुरेपूर फसवणूक झाल्यानंतर पीडित महिलेने सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांचेशी संपर्क केला. पिडीत महिलेने मांत्रिकबाई विरोधात लेखी तक्रार दिली. सांगली अंनिसने या गंभीर प्रकाराची दखल घेतली. मांत्रिक गौराबाई बुवाबाजी करते का? याची खातरजमा करण्यासाठी  सांगली अंनिसचे कार्यकर्ते प. रा. आर्डे, आशा धनाले व त्रिशला शहा हे गौराबाईच्या दरबारात डमीभक्त म्हणून गेले. कार्यकर्त्या आशा धनाले यांनी त्यांना अघोरी त्रास होत असल्याचे गौराबाईस खोटे सांगितले. त्यानंतर गौराबाई यांच्या अंगात म्हाकुबाईचे वारे संचारले व त्या अवस्थेत मांत्रिकबाईने धनाले यांना सवतीने तुमच्यावर करणी केली आहे. त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय, असे सांगितले. करणी काढण्यासाठी ‘दर रविवारी दरबारात हजरी लावायला या,’ असा सल्ला दिला. करणीवर उतारा म्हणून भंडारा, गळ्यात बांधायला मंत्रून व गोमुत्रात बुडवून काळा दोरा दिला. तसेच अंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठी बाटलीभरून गोमूत्र दिले. हे सर्व बघून गौराबाईच्या खोटे अंगात येऊन ती लोकांची फसवणूक करत आहे, असे अंनिस कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर अंनिस कार्यकर्त्यांनी थेट मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन तेथील पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांची भेट घेतली. त्यांना या बुवाबाजीच्या प्रकाराची सविस्तर माहिती देऊन मांत्रिकबाईवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी पीडित महिलेचा लगेच जबाब नोंदवून घेतला आणि स्वत: पाटील यांनी पोलीस गाडी, पंच, फोटोग्राफर घेऊन आरगला मांत्रिकबाईच्या दरबारावर धाड टाकली. दरबारामध्ये पोलिसांना करणी काढण्याच्या अनेक आक्षेपार्ह गोष्टी, वस्तू मिळाल्या. मांत्रिक गौराबाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणले. त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलिसांच्याकडून सुरू आहे. 

या कारवाईत स्वत: पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलीस नाईक बंडू पवार, सचिन पाटील, महिला कॉन्स्टेबल उज्ज्वला बांडगे, पोलीस हवलदार संभाजी पवार यांचेसह अंनिस कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे, आशा धनाले व त्रिशला शहा यांचा सहभाग होता. 

मांत्रिक गौराबाई या आरग-बेडग परिसरात गेली अनेक वर्षे म्हाकुबाई अंगात आणून लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम करतात. दर रविवारी त्यांच्या घरी मोठा दरबार भरतो. त्या भक्तांना करणी, बाहेर बाधा काढून देतो, असे अमिष दाखवून फसवणूक करत असतात. मांत्रिक गौराबाई यांचेकडून फसवणूक झालेल्या भक्तांनी निर्भयपणे पुढे यावे आणि पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन सांगली अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे, सचिव डॉ.सविता अक्कोळे, प्रा.अमित ठकार, शशिकांत सुतार यांनी केले आहे.

बुवाबाजीविरोधात त्वरीत आणि धडक कारवाई करणारे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील आणि त्यांच्या टीमचे सांगली अंनिसने अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय