Wednesday, May 8, 2024
Homeविशेष लेखरशियन मिसाईल्स आणि पाश्चिमात्य टेक कंपन्यांचे 'चिप' संबंध

रशियन मिसाईल्स आणि पाश्चिमात्य टेक कंपन्यांचे ‘चिप’ संबंध

“आम्ही आता युक्रेन वरील मिसाईल अटॅक येणाऱ्या काळात वाढवणारं आहोत”. असं व्लादिमिर पुतीन यांचं वक्तव्य नुकतंच आलंय. रशिया सुरुवातीपासून युक्रेनच्या रेल्वे स्टेशन, विद्युत निर्मिती केंद्र यावर या मिसाईल ने हल्ला करत आहे. आता या युद्धाला ७१० दिवस होत आलेत. युद्ध सुरूच आहे. एक प्रश्न उपस्थित राहतो की इतके प्रतिबंध लावूनही रशियाच्या मिसाईल निर्मितीवर परिणाम कसा होतं नाहीये? याचं उत्तर युक्रेनियन लोकांना मिसाईल च्या मलब्यात मिळालंय. पाश्चिमात्य देशांच्या मदतीशिवाय रशिया मिसाईल बनवू शकतं नाही. या मिसाईल मध्ये जे पॉवर कन्व्हर्टर आढळलेत ते अमेरिकन कंपनी ‘वायकोर’ ने बनवलेले आहेत. हे मिसाईल मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सने भरलेले आहेत. सगळ्यात महत्वाचे असलेले भाग हे पश्चिमेकडील देशांकडून आलेले आहेत. कम्युनिकेशन कंट्रोलर ‘झायलॉग’ या अमेरिकन कंपनीने बनवलेले आहेत.

गायडिंग सिस्टिम जे तीन मायक्रोप्रॉसेसर वर चालते ते तिन्ही ‘टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स’ या अमेरिकन कंपनीने बनवले आहे. आणि या सर्वांचा मेंदू म्हणजे मायक्रोचिप. जी बनवली आहे अमेरिकन मायक्रोचिप क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ‘इंटेल’ ने. इंटेलला अमेरिकन सरकारने अमेरिकेला मायक्रोचिप हब बनविण्यासाठी सबसिडी देऊ केल्या आहेत. युक्रेनला असं आढळलंय की रशियाला मिसाईल बनवण्यासाठी ज्या ४५० पाश्चिमात्य तांत्रिक गोष्टी लागणार आहेत ज्यातील बहुतांशी अमेरिकन कंपन्या बनवतात. या गोष्टी रशिया स्वबळावर बनवू शकतं नाही. इतक्या देशांचे प्रतिबंध असताना हे सर्व रशियात कसं पोहोचतं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अवैधरित्या हे सर्व शेल कंपन्या, कंपन्यांची खोटी नावं, जहाजांचे लांब मार्ग वापरून या सर्व गोष्टी रशियन मिलिटरी पर्यंत पोहोचतात. ज्यातील बहुतांश गोष्टी ड्रोन, मिसाईल यामध्ये वापरल्या जातात ज्या गोष्टी रशिया युक्रेन विरोधात युद्धामध्ये वापरते. एका चिपचा प्रवास हा आधुनिक तंत्रज्ञानापासून युद्ध अधिकाधिक घातक करेपर्यंत आला आहे.


फेब्रुवारी २०२२, म्हणजे युद्ध सुरू झाल्या पासून रशियाने युक्रेनवर ५००० मिसाईल डागली आहेत. ज्यामुळे युक्रेनची ऊर्जा केंद्रे, पायाभूत सुविधा यांवर हल्ला करून अर्थव्यवस्था कोसळून टाकली. यामुळं रशिया वर अनेक देशांनी प्रतिबंध आणले जेणेकरून बलाढ्य कंपन्या रशिया ला मदत करणार नाहीत. रशियाला अशा रितीने चिप्सचा पुरवठा बंद केल्याने रशिया मिसाईल हल्ले थांबवेल असं अनेक देशांना वाटलं मात्र तसं झालं नाही. युक्रेनला मलब्यात मिळालेल्या मिसाईलच्या तुकड्यांतून आढळतं गेलं की यातील घटक नेदरलँड्स, अमेरिका, चीन, रशिया, हॉंगकॉंग, जर्मनी, साऊथ कोरिया, स्वित्झर्लंड या देशातील कंपन्यांनी बनवली आहेत. ‘टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स’, ‘ऍनालॉग डिवायसेस’ या अमेरिकन कंपन्यांचे घटक यात समाविष्ट होते. अनेक मिसाईल पाहिल्यानंतर हेच आढळत गेलं की हे सर्व घटक पाश्चिमात्य देशांनी बनवली ज्यामुळे रशिया हे सर्व करू शकला. प्रतिबंध असतानाही रशियापर्यंत हे मायक्रोइलेक्ट्रॉनिक पदार्थ पोहोचले कसे? हे पोहोचले या मार्गातील लूपहोल वापरून.

न्यूयॉर्क मधील दोन कंपन्या ‘एस. एन. इलेक्ट्रॉनिक्स’ आणि ‘एस. एच. ब्रदर्स’. या इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युटिव्ह कंपन्या म्हणून रजिस्टर आहेत. या कंपन्या ‘निक स्टिव्हन्स’ किंवा ‘जिओ रॉस’ नावाने वावरणाऱ्या ३ लोकांच्या नावावर आहेत. या कंपन्या दशलक्ष डॉलरच्या इलेक्ट्रॉनिक्सचे शिपिंग अनेक मध्यस्थ देशांना करतात, जिथे रशियाला पदार्थ शिपिंग करण्याचे नियम नाहीत. हे देश आहेत तुर्कीये, इंडिया, सिंगापूर, हॉंगकॉंग, चीन. तिथून त्या चिप्स रशियन कंपन्यांना पुरवले जातात जे रशियन मिलिटरीला हे पदार्थ पुरवतात. सिंगापूर मधील एक कंपनी सिलिकॉन व्हॅली मधून चिप्स घेऊन ते २,५०,००० अमेरिकन डॉलरचे चिप्स रशियन कंपनी ‘ट्रेडिंग हाऊस ड्रेयडटुल्स’ला विकते. या कंपनीचा रशियन मिलिटरीशी काहीही संबंध नाही. मात्र ही कंपनी हेचं चिप्स ‘रॉबिन ट्रेड’ या फेक कंपनीला विकते. ही कंपनी या चिप्स ‘सेर्निया इंजिनीरिंग’ या कंपनीला विकते. ही कंपनी रशियन स्पाय एजन्सी ‘एफ.एस.बी’ ची फ्रंट कंपनी आहे. या पद्धतीने रशियन स्पाय एजन्सी एका कमर्शिअल सिविलाइज्ड पद्धतीने हे चिप्स विकत घेतल्याचा आभास निर्माण करण्यात यशस्वी ठरते.


जर्मनी मधील चिप्स टेक कंपनी युक्रेन युद्धापूर्वी रशियाला चिप्स विकत होती मात्र युद्धानंतर निर्बंधांमुळे यावर बंदी आली. ती कंपनी नंतर याचं चिप्स ‘अझू इंटरनॅशनल’ या टर्किश कंपनीला विकू लागली. तिथुन या चिप्स रशिया पर्यंत जाऊ लागल्या. त्यानंतर ‘अझू इंटरनॅशनल’ ने ७ महिन्यात २० दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या चिप्स रशियाला विकल्या. ज्यामध्ये अनेक मायक्रोचिप्स अमेरिकन कंपन्यांकडून आल्या. आणि मिसाईल्सचा मारा सातत्याने सुरू राहिला. हॉंगकॉंग मध्ये रजिस्टर असलेली ‘पिक्सल डिवाइसेस’ ज्या कंपनीचे मालकी हक्क सिंगापूर मधील ‘एशिया ग्लोबल निओलिंक’ कंपनीकडे आहेत, ज्या कंपनीचे मालकी हक्क सेशेल्स बेटावरील ‘व्हाईट विंग्स’ कंपनीकडे आहेत. या ‘पिक्सल डिवायसेस’ नावाच्या कंपनीतून चिप्स मालदिव्स ला पाठवले जातात. आणि तेथून रशियाला. ‘पिक्सल डिवायसेस’ ही एक शेल कंपनी आहे. ज्यामध्ये फक्त एकंच ऑफिसर आहे. या स्पॅनिश व्यक्तीचा कतालोनियाला ऐरोप्लॅन क्लब आहे. तरीही ही कंपनी रशियाला २०० दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पुरवते. ज्यात ‘इंटेल’ आणि ‘ए.एम.डी.’ या अमेरिकन कंपनीच्या ५०,००० अमेरिकन डॉलर इतक्या किंमतीच्या वस्तूंचा समावेश आहे.

चीनमधील ‘किंग पाय टेक्नॉलॉजी’ या कंपनीने पाश्चिमात्य देशातून आलेल्या चिप्स इंडियन कंपनीकडून विकत घेतल्या आणि रशियन मिलिटरीला विकल्या. मात्र जेव्हा अमेरिकेने या कंपनीवर निर्बंध घातले तेव्हा त्याचं कंपनीच्या ‘3 एच सी सेमीकंडक्टर’ या शेल कंपनी कडून विकल्या. या शेल कंपनीचे मालक ‘याओ जींबीआवो’ आणि ‘याओ झेहोंग’ या खोट्या नावाने आपला उद्योग चालवत राहिले. एकदा पहिली कंपनी वापरून आणि नंतर दुसरी कंपनी वापरून हा व्यवहार चालू राहिला. कझाकिस्तान मध्ये याचं मुळे चिप्स ची स्मगलिंग वाढली. एक डच व्यक्ती स्वतःच्या कंपनी मधून या चिप्स पाठवतं राहिला आणि ही स्मगलिंग आणि रशियाशी चिप्सचा पुरवठा वाढला. किर्गिस्थान मध्ये जर्मनीने चिप्स विकल्याने तिथे चिप्स चा व्यापार १००० पटीने वाढला. सर्वच चिप्स रशियात जाऊ लागले. या पद्धतीने निर्बंध घातल्यानंतर ही रशियाच्या मिसाईल्सचा मारा युक्रेन वर चालू आहे. पाश्चिमात्य देश युक्रेन ला आर्थिक व लष्करी मदत करत आहेतच मात्र त्याच बरोबर रशियाला पाश्चिमात्य कंपन्या अमाप मदत करत आहेत. नफ्यासाठी हा दुटप्पीपणा अनेकांचा जीव घेणारा आणि मानवतेच्या गळ्याला नख लावणारा आहे.
लेखन -सर्वेश

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय