रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड, महाडलगतची तीस गावे व तळीये येथील पूर व दुर्घटनाग्रस्त ठिकाणांना खासदार संभाजी राजे रांनी भेट दिली. तळीये या गावी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे ८० जण मृत्यूमुखी पडले. या मृतात्म्यांना शासकीय इतमामात श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे, स्थानिक प्रशासकीय अधिकारी, विकास भरतशेठ गोगावले, तळीये गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे झालेल्या या दुर्घटनेत तळीये गाव पूर्णतः विस्थापित झाले असून या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी ‘म्हाडा’ तयार आहे मात्र, तळीये गावाच्या जवळपास शासनाकडे तूर्तास यासाठी योग्य जमीन उपलब्ध नसल्याचे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.
रायगड विकास प्राधिकरणाकडे दुर्गराज रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे ८० एकर जमीन संपादित केलेली असून याठिकाणी प्राधिकरणामार्फत शिवकालीन वस्तुसंग्रहालये व माहिती व इतिहास संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क करून रायगड प्राधिकरणाच्या या ८० एकर जागेपैकी तीन एकर जागा तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी देण्याची इच्छा खासदार संभाजी राजे यांनी व्यक्त केली.
तसेच या गावाचे पुनर्वसन करीत असताना येथील घरांची रचना ऐतिहासिक शिवकालीन धाटणीने करून, स्थानिक संस्कृतीचे पुनरूज्जीवन करून या गावास जागतिक दर्जाच्या पर्यटनाशी जोडण्याची संकल्पना संभाजी राजे यांनी मांडली.
या माध्यमातून पुनर्वसनाबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून या ग्रामस्थांना रोजगारही उपलब्ध होईल. यावर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका दर्शवली असून, रायगड विकास प्राधिकरण व म्हाडाच्या संयुक्त विद्यमातून अशा पद्धतीने तळीये गावाचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्नशील राहू, असे सांगितले.