स्वराज्याचे तोरण बांधलेला किल्ला तोरणागड आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडाचा आता सर्वांगीण विकास होणार आहे.या आराखड्यानुसार आगामी काळात येथे पर्यटकांसाठी किल्ल्यावर वॉकिंग प्लाझा, बाग-बगीच्या, स्वच्छतागृह, आरोग्य सुविधांसह अन्य पायाभूत सुविधा आणि किल्ल्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. पुण्यातील ऐतिहासिक वेल्हे तालुक्याला मोठा इतिहास आहे.
मात्र, अनेक वर्षांपासून हा भाग मागास म्हणूनच ओळखला जातो. परंतु, राजगड आणि तोरणागडाच्या विकासामुळे याची आता नव्याने ओळख निर्माण होणार आहे. राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडून किल्ले रायगडप्रमाणेच राजगड आणि तोरणागडाचा विकास करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार किल्ले राजगड आणि तोरणागडाचा सर्वांगीण विकास आराखडा करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या शासनाकडून या आहेत अपेक्षा
पायथ्याला पर्यटकांच्या गाड्या पार्किंगची व्यवस्था
किल्ल्यावर स्वच्छतागृह ? माहितीदर्शक फलक बसवावेत
किल्ल्याच्या बुरुजांची, तटबंदीची दुरुस्ती करावी
सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी
भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून द्यावा
महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडून या दोन ऐतिहासिक किल्ल्यांचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. पुढच्याच महिन्याच्या म्हणचेच मार्च 2023 अखेरपर्यंत हा आराखडा तयार होणार आहे. त्यात किल्ल्याच्या ऐतिहासिकतेला कोणताही धक्का बसविला जाणार नाही, असे पुरातत्त्व अधिकार्यांनी सांगितले.