पुणे : पोलीसनामाचे वरिष्ठ पत्रकार प्रसाद गजानन गोसावी यांचे दीर्घ उपचारानंतर निधन झाले. ते 45 वर्षाचे होते. त्यांच्या मागे भाऊ 2, बहिणी 2, पुतणे असा परिवार आहे. अपघातानंतर तब्बल सव्वा महिन्याच्या संघर्षानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Pune)
प्रसाद गोसावी हे पोलीसनामाचे वरिष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत होते. कामावरुन घरी जात असताना २२ जुलै रोजी रात्री १० वाजता खडकी रेल्वे स्टेशनजवळ त्यांची बाईक स्लीप झाल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता.
त्यांना तातडीने पिंपरीतील वाय सीएम हॉस्पिटलमध्ये (YCMH ) दाखल करण्यात आले. त्यानंतर निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यांनी मृत्यूशी गेले सव्वा महिना संघर्ष केला. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. डॉक्टरांनी रविवारी (दि. 01) सकाळी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. (Pune)
त्यांच्या इच्छे नुसार प्रसाद यांचे अवयव दान करण्यात आले. प्रसादचे डोळे, हृदय,दोन फुप्फुसे, यकृत, व एक किडनी हे अवयव काढून त्यांना गरजू रुग्णांना दान करण्यात आले.
मृत्यूनंतर प्रसाद हे अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत. मृत्यूनंतर काही तासांतच त्यांच्या हृदयाचे एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण झाले. प्रसाद यांची मृत्युसोबत केलेली झुंज अपयशी ठरली आहे. अवयवदानानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. निगडीच्या स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.