परळी : परळी तालुक्यातील मोहा गावात मोदी सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विरोधात २६ मे हा दिवस निषेध दिन आणि देशव्यापी काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्या अनुषंगाने मोहा गावात काळे झेंडे घेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आले.
भारतीय जनता मोठ्या आशेने देशाचा विकास होईल या भ्रमात भाजप सरकारला एकहाती सत्ता दिली. यानंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेऊन ‘सबका साथ सबका विकास’ हि घोषणा देऊन जनतेची निव्वळ दिशाभूल करण्याचा प्रवित्रा घेतला आणि या घटनेला आजमितीस ७ वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे आज काळा दिवस पाळण्याची हाक शेतकरी व कामगार संघटनांनी दिली होती.
मोदी सरकारने कॉर्पोरेटस कंपन्या बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा विक्रम केलेला आहे. रेल्वे, विमान, जल वाहतूक, पोस्ट, एलआयसी, राष्ट्रीयकृत बँका, खनिज संपत्ती या सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण, जीएसटी, नोटबंदी, शेतकरी व कामगार विरोधी कायदे पारित केले. राष्ट्रीय उत्पन्नात घट आणि महागाईत वाढ झाली. खाद्य तेलाचे भाव तिप्पट झालेले आहे. कृत्रिम साठेबाजीला अप्रत्यक्ष खतपाणी घातले जात आहे. भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. कारण कोरोनाचा धोका दिसत असताना सुद्धा या ठोस अंमलबजावणी न करता कामात ढिलाई दाखविल्यामुळे आज देश याचे फळ भोगत आहे. अशी टीका माकपचे अजय बुरांडे यांनी केली आहे.
यावेळी मोहा ग्रा.पं. समिती सदस्य कॉ. सुदाम शिंदे, कॉ. खयुम शेख, कॉ. विनायक राजमाने, कॉ. सखाराम शिंदे, DYFI चे विशाल देशमुख, मनोज देशमुख, बाळासाहेब शेप, मदन वाघमारे, SFI चे अशोक शेरकर, अंकुश कोकाटे, प्रवीण शिंदे, वैजनाथ पाळवदे व अन्य उपस्थित होते.