पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुळे अनेक रुग्ण गंभीर स्थितीत असताना महापालिका प्रशासनाने रेमडेसिवीर इंजेक्शनची केलेली खरेदी टक्केवारी मिळत नाही म्हणून स्थायी समितीने “वेटिंग”वर ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या संबंधिताने टक्केवारी दिली तरच खरेदीच्या खर्चाला मंजुरी देऊ, असा पवित्रा स्थायी समितीने घेतला आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये व कोरोना केअर्स सेंटरमध्ये दाखल गंभीर कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी शहरभर धावाधाव करावी लागत आहे. तसेच पुण्यात जाऊन या इंजेक्शनचा शोध घ्यावा लागत आहे. कोरोना महामारीतही स्थायी समितीने टक्केवारीसाठी बेशरमपणाचा कळस गाठल्याने राजकारण्यांमधील माणुसकी संपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
शहरात कोरोना आजाराने अक्षरशः थैमान घातले आहे. रोज ३ हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यातील अनेकांमध्ये या आजाराची गंभीर लक्षणे आढळून येत आहेत. अशा रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सिजन बेडसोबतच रेमडेसिवीर इंजेक्शन मोठा आधार ठरते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने नाशिक येथील एका पुरवठादाराला ५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार या पुरवठादाराने सर्वात कमी दराने म्हणजे ६६० रुपयाला एक याप्रमाणे ३ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन महापालिकेला पुरवले आहेत.
उर्वरित २ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा लवकरच महापालिकेला पुरवठादाराकडून प्राप्त होणार आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी संबंधित पुरवठादाराला ३३ लाख रुपये अदा करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. परंतु, जोपर्यंत आम्हाला टक्केवारी मिळत नाही, तोपर्यंत पुरवठादाराला ३३ लाखांचा खर्च अदा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने समिती सभेपुढे ठेवायचे नाही, असा पवित्रा स्थायी समितीने घेतल्याचे समजते. महापालिकेला अगदी कमी दरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा केल्यामुळे संबंधित पुरवठादारानेही स्थायी समितीला एक रुपयाचीही टक्केवारी देणार नसल्याचे ठणकावले आहे. तसेच पुरवठादाराने पैसे मिळत नसल्याने उर्वरित २ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा देखील थांबल्याचे समजते.
स्थायी समितीच्या टक्केवारीमुळे महापालिकेची रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटर्समध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यातून गंभीर लक्षणे असलेल्या कित्येक कोरोना रुग्णांचा प्राण गेल्याचेही नाकारता येत नाही. स्थायी समितीने केवळ आपल्या स्वतःच्या टक्केवारीसाठी गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी वेठीस धरले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्थायी समितीच्या या टक्केवारीमुळे राजकारण्यांमधील माणुसकी कधीच संपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या विश्वातील किडेमुंग्या, पशुपक्षी, रानेवने आणि झाडाझुडपांच्या पसाऱ्यात जगणाऱ्यांपेक्षा काहीसा अधिक सतर्क मेंदू आणि दोन हात व दोन पाय असे थोडेसे वेगळेपण माणसाला लाभले म्हणून माणूस स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत असतो. पण ते किती कचकडीपणाचे आहे, याची जाणीव स्थायी समितीच्या या टक्केवारीने करून दिली आहे. स्थायी समितीला लाज वाटावी, असे कोणतेच संकेत जिवंत नसल्यासारखी परिस्थिती आहे.