पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जळीतग्रस्तांवर तातडीने उपचार व पुनर्वसन करण्यासाठी एक सुसज्ज जळीत कक्ष स्थापन करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.महापालिका स्थापन होऊन साडेतीन दशके उलटल्यानंतर सुद्धा पिंपरी-चिंचवडमध्ये बर्निंग वॉर्ड नाही.त्यामुळे या काळात गंभीर भाजल्याने अनेकांचे जीव गेले आहेत
आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रस्तावित जळीत कक्षाची संभाव्य जागा,दर्जा आणि क्षमता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या जळीत कक्षाच्या प्राथमिक खाटांची क्षमता १५ ते ३० असण्याची शक्यता आहे.खाटांच्या क्षमतेबाबत पुढील आढावाबैठकीत सविस्तर निर्णय घेण्यात येणार असून जळीत कक्षासाठी निवडलेल्या स्थळांची पाहणी आयुक्तांकडून करण्यात येणार आहे.महापालिकेने आगीमुळे होणाऱ्या दुखापतींच्या समस्येकडे लक्ष देण्याच्या दिशेने एक सकारात्मकपाऊल उचलले असून जळीत कक्षाद्वारे पीडितांना उपचार,विशेष काळजी आणि त्यांनाशारीरिक आणि मानसिक आघातातून सावरण्यासाठी मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचीमाहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे,यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे,अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार आदी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह यांनी बैठकीत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी जळीत कक्षाची रचना आणि तेथील आवश्यक सुविधा,मनुष्यबळ आदींबाबत सादरीकरण केले. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून योग्य रुग्णालयाच्या जागेबाबत त्वरीत अहवाल सादर करावा,असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.अहवाल प्राप्ती नंतर योग्य ठिकाणी जळीत कक्ष सुरु करण्यात येणार आहे.
प्रस्तावित जळीत कक्षात आगीमुळे दुर्घटनाग्रस्त झालेल्या रुग्णांवर उपचार आणि त्यांचे पुनर्वसन करण्यावर भर दिला जाणार आहे,यासाठी महापालिका रुग्णालयांच्या संरचनेमध्ये फेरबदल, नूतनीकरण किंवा सुधारणा करण्यात येणार आहे. यामध्ये आवश्यक मनुष्यबळ आणि अत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठीही गुंतवणूक करण्यात येणार असून रुग्णांना पाठपुरावा आणि पुनर्वसन सेवा देखील पुरविली जाणार आहे.
महापालिकेने आगीमुळे होणाऱ्या दुखापतींच्या समस्येकडे लक्ष देण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले असून जळीत कक्षाद्वारे पीडितांना उपचार, विशेष काळजी आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक आघातातून सावरण्यासाठी मार्गदर्शन देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.