पिंपरी चिंचवड : शहरातील खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी, नगरसेवक यांनी स्वखर्चाने आयसीयु, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.
मारुती भापकर म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात रोज तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोना बाधित सापडत आहेत. प्रत्येक दिवशी 50 पेक्षा अधिक रुग्णांचे बळी जात आहेत. शहरातील महापालिका व खाजगी रुग्णालय हाऊसफुल आहेत. कोविड रुग्ण व त्यांचे नातेवाईक ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड, रेमडिसीवर इंजेक्शन साठी खासदार,आमदार, मनपा पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडे मदत मागत आहेत. मात्र रुग्णांची प्रचंड वाढत असलेली संख्येमुळे त्यांच्या कडूनदेखील बेड उपलब्ध होत नाही. प्रशासन व त्यांची यंत्रणा तोकडी पडत असल्यामुळे हतबल झालेले दिसते.
भापकर यांनी म्हटले आहे की, आमदार, खासदार, पदाधिकारी, नगरसेवक वेगवेगळी पत्रकबाजी करून वेगवेगळ्या मागण्या करताना दिसतात. ही वेळ कागदी घोडे नाचवण्याची नसून प्रत्यक्ष कृती करण्याची आहे. शहरातील बहुतांशी लोकप्रतिनिधी बांधकाम व्यावसायिक असून यांच्या पाचशे, हजार फ्लॅटच्या स्कीम शहरात सुरू आहेत. बहुसंख्य लोकप्रतिनिधींचे मोठमोठे मंगल कार्यालय आहेत. आम्ही आमच्या स्कीम मध्ये अथवा मंगल कार्यालयात स्वखर्चाने कोविड सेंटर सुरू करू इच्छितो त्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी. असा पुढाकार घेताना कोणी हि दिसत नाही, अशी टिका ही केली आहे.
पिंपरी-चिंचवडकर लोकप्रतिनिधींंचे मतदार असून ते आज रामभरोसे आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. एका सामान्य कुटुंबातील पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी अकराशे बेडचे कोविडसेंटर उभे करतो. श्रीगोंदा तालुक्यात अनुराधा नागवडे अडीचशे बेडचे कोविड सेंटर सुरू करतात. मग विभागातील आमच्या खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी, अनेक नगरसेवक यांच्याकडे आमदार लंके यांच्या पेक्षा कितीतरी मोठी क्षमता आहे. तरी शहरातील क्षमता असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींना नम्र विनंती करतो की आपण स्वयंस्फूर्तीने आमदार निलेश लंके यांच्या प्रमाणे आयसीयु, ऑक्सिजन व्हेंटिलेटर युक्त छोटे-मोठे सेंटर खर्चाने सुरू करावीत, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.