नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून घेतली जाणारी नीट पीजी परीक्षा देखील लांबणीवर टाकली गेली आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 15 दिवस अभ्यासाला वेळ मिळेल अशा पद्धतीनं तारीख जाहीर केली जाईल, असं पोखरियाल म्हणाले.
UGC NET Exam काय आहे ?
देशभरातील विद्यापीठ तसेच अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये कनिष्ठ संशोधक छात्रवृत्ती (Junior Research Fellowship) आणि सहाय्यक प्राध्यापक (Asisstant Professor) पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (UGC) नॅशनल इलिजिबिलिटी टेस्टचे (NET) आयोजन केले जाते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. मात्र , 2020 साली कोरोना महामारीमुळे या परीक्षांचे आयोजन लांबले होते.