साहित्य क्षेत्रातील कवी,लेखक, साहित्यिक व पत्रकार उपस्थित राहणार
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर: स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालय व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या माध्यमातून निगडी प्राधिकरण येथे गुरुवार दिनांक ७ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकतेच प्रसिद्ध झालेल्या डावी वाळवी व असत्यमेव जयते पुस्तकांचे प्रसिद्ध लेखक अभिजीत जोग या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. या वाचकांच्या मेळाव्यामध्ये अधिकाधिक वाचकांनी सहभागी व्हावे असे दोन्ही संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना करणे,ग्रंथ,लेखक, सेवक व वाचक या घटकांत सुसंवाद राखून ग्रंथालये समृद्ध करणे, त्यांना चिरस्थायी स्वरूप प्राप्त करून देणे इ. आमच्या ग्रंथालय–चळवळींची उद्दिष्टे असून. त्या दृष्टीने ग्रंथालय–चळवळीचा इतिहास निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रयत्न करीत असून वाचक मेळावा हा त्यातलाच एक भाग आहे असे रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रमुख गीता खंडकर यांनी सांगितले.
‘वाचाल तर वाचाल’ असा मंत्र सांगितला जातो, ते उगीच नाही. बौध्दीक आणि सामाजिक विकासासाठी वृत्तपत्रे, ग्रंथ आणि ग्रंथालयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचा केवळ उक्तीतून उद्घोष न होता ती कृतीतून प्रत्ययास आणण्याचे कार्य वृत्तपत्र व पुस्तकांच्या रुपाने होऊ शकते. आजच्या पिढीवर असे संस्कार करण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरे प्रभावी माध्यम नाही म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी वृत्तपत्र विक्रेता संघ नेहमीच सकारात्मक भूमिका घेत आहे.
वाचक मेळाव्यास सर्वांनी अधिक संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा असे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांनी आवाहन केले आहे.