Thursday, December 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त एक लाख घरांत ‘मंगल संच’

PCMC:राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त एक लाख घरांत ‘मंगल संच’

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा अध्यात्मिक उपक्रम

पूजा, उत्सव अन्‌ आनंदोत्सव साजरा करण्यासाठी
पुढाकार

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:जगभरातील हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारे शहरातील एक लाख घरांमध्ये ‘मंगल संच’ वाटप करण्यात येत आहे. तसेच, भाजपा परिवारातील सदस्यांकडून घरोघरी अक्षता पोहोच केल्या जात आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. २२ जानेवारी २०२४ रोजी राम जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभरामध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

‘मंगल संच’ मध्ये प्रभू श्रीराम प्रतिमा, मंगल अक्षता, भगवा ध्वज, प्रसाद, घराच्या प्रवेशद्वारावर चिटकवण्यासाठी स्टिकर,रामभक्तांसाठी मफलर, बॅच, भगवी टोपी,पणत्या,तिळगूळ इत्यादी साहित्याचे वाटप दि.१७ ते दि.२० जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने घरोघरी अक्षता आणि मंदिराचे फोटो पाठवून दि. २३ जानेवारीपासून ‘श्री रामाच्या दर्शनासाठी या…’ असे निमंत्रण दिले जात आहे. या अभियानामध्ये सहयोग देण्याच्या उद्देशाने आम्ही ‘मंगल संच’ घरोघरी वाटप करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिवाळी साजरी करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार या ‘मंगल संच’द्वारे नागरिक उत्सव साजरा करतील, असा विश्वास आहे.

तसेच, यावर्षी सुमारे दीड लाख नागरिक, व्यावसायिक अस्थापनांमध्ये प्रभू श्रीराम यांना समर्पित दिनदर्शिकांचे वाटप घरोघरी करण्यात आले आहे.तसेच, यावर्षीची दैनंदिनी (डायरी) सुद्धा श्रीराममय असून,त्याचे एक लाख लोकांना वाटप करण्यात आले, असेही आमदार लांडगे यांनी सांगितले.

घरोघरी प्रभुरामाची प्रतिमा पोहोचवण्याचा संकल्प

अयोध्येतील श्रीराममंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासह विविध विधी संपन्न होत आहेत. संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. प्रभु श्रीराम मंदिरामध्ये अवतरणार असल्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभणार आहे. यासाठी श्रीरामांच्या चरणी आणि ज्या कारसेवकांनी प्राणांचे बलीदान देऊन श्री रामजन्मभूमी मुक्त केली, त्यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. ‘मंगल संच’ च्या माध्यमातून प्रतिमा पूजन साहित्य आणि अन्य वस्तू देण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या घराघरांत प्रभू श्रीराम यांची प्रतिमा पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे.
महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

संबंधित लेख

लोकप्रिय