वाल्मिकी समाजबांधवांचा केला सन्मान !
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : रहाटणी येथील राजवाडे यांच्या श्रीराम मंदिरात रामायण काव्याचे रचिता महर्षि वाल्मिकी यांची प्रतिमा स्थापन कार्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
या निमित्ताने मंदिराचे माननीय विश्वस्त अंकुश राजवाडे, समरसता गतिविधि जिल्हा संयोजक महेंद्र बोरकर आणि समरसता साहित्य मंचचे सुहास घुमरे, अखिल वाल्मीकी समाज महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष धनपत बेहनवाल, प्रदेश सचिव योगेश रेणवा, वाल्मिकी समाज प्रतिनिधी राजेश बडगुजर, अनिल लखन तसेच औंध हॉस्पिटल वाल्मिकी मित्रमंडळाचे राजबाबु सरकनिया, संस्कार भारतीचे अध्यक्ष सचिन काळभोर, समरसता गतिविधीचे गट संयोजक अनय मुळे, मार्गदर्शक नरेंद्र पेंडसे इत्यादी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी वाल्मिकी समाजाच्या सर्व मान्यवरांचा सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात आला यावेळी या उपक्रमाचा उद्देश नरेंद्र पेंडसे यांनी नमूद केला. महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेची विधीवत पूजा पार पडल्यांनंतर संस्कार भारतीच्या संगीत विधेच्या सह संयोजिका शर्मिला शिंदे, निलेश शिंदे, स्वरा शिंदे, योगेंद्र होळकर यांच्या प्रभू श्रीरामावरील सुश्राव्य भक्तिगीते सादरीकरणाने रंगत आणली.
महर्षि वाल्मिकी यांच्या महान कार्याचे स्मरण रहावे यासाठी प्रत्येक राम मंदिरांत अशी महर्षि वाल्मीकी प्रतिमा, मूर्ती स्थापित करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, सर्व राम मंदिरांत जयंती साजरी व्हावी अशी इच्छा यावेळी सर्व समाज बांधव यांनी प्रकट केली.
भारतीय संस्कृतीत प्रभू श्रीराम यांचे स्थान अनन्य साधारण आहे, महर्षी वाल्मिकी यांनी रचलेल्या रामायण या महाकाव्यामुळे जनमाणसात श्रीराम यांची भगवान म्हणून पूजा होते. आज महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा स्थापित करून त्यांच्या महान कार्याची उचित दखल घेतली गेली, प्रत्येक प्रभू श्रीराम मंदिरात महर्षी वाल्मिकी यांचा फोटो लावणे, महर्षी वाल्मिकी यांचे कार्य समाजाला समजावून सांगणे हा अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि वाल्मिकी समाजाच्या बेडा पंचायत ठिकाणांवर ही महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा लावण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन समाजाचे प्रतिनिधी राजेश बडगुजर यांनी केले.
यावेळी गायन सेवा देणाऱ्या संस्कार भारतीच्या कलासाधक शर्मिला शिंदे आणि सहकाऱ्यांचा संघचालक (चिंचवड गट) प्रतापराव जाधव यांच्या शुभहस्ते भगवद्गीता देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सचिन दादा काळभोर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.