Thursday, December 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ४२ वर्षांची मैत्री जपत ज्येष्ठ पत्रकारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य...

PCMC : ४२ वर्षांची मैत्री जपत ज्येष्ठ पत्रकारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले

ज्येष्ठ पत्रकार विनायक चक्रे आणि शिवाजीराव शिर्के यांनी दिला मैत्री जपण्याचा संदेश (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्रात बुधवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघात इतर मतदार संघापेक्षा कमी मतदान झाले. मात्र महिला व ज्येष्ठांचा या निवडणुकीत मतदान करण्याचा उत्साह उल्लेखनीय होता. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला लोकशाहीतील हक्क बजावावा असा संदेश देत ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के (वय ८१ वर्ष)आणि विनायकराव चक्रे (वय ७८ वर्ष) यांनी दिला. संत तुकाराम नगर पिंपरी येथील अण्णाभाऊ साठे प्रशालेत मतदान केले. (PCMC)

यावेळी शिर्के माध्यम प्रतिनिधींची बोलताना म्हणाले की, गडचिरोली, चंद्रपूर हिंगोली तसेच राज्यातील इतर ग्रामीण व दुर्गम भागात या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह लोकशाहीला पोषक व लोकशाही वृद्धिंगत करणारा आहे. परंतु शहरी भागात सर्व सेवा, सुविधा उपलब्ध असताना पिंपरी सारख्या भौगोलिक दृष्ट्या छोट्या असणाऱ्या मतदारसंघात मतदान कमी होणे योग्य नाही.

संत तुकाराम नगर, वल्लभ नगर, कासारवाडी, फुगेवाडी परिसरातील आमच्या ज्येष्ठ मित्रमंडळींचा एक मैत्री गट आहे. आम्ही सर्वांना मतदान करण्याबाबत आवाहन केले. मी व माझे जेष्ठ पत्रकार मित्र विनायक चक्रे यांनी आत्तापर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान केले आहे. आमची गेल्या ४२ वर्षांची मैत्री आजही टिकून आहे.

आमच्या तरुण पणाच्या काळात पिंपरी चिंचवड मध्ये अनेक कारखाने उभे राहत असताना राज्यभरातून शिक्षित, अल्पशिक्षित तरुण नोकरीसाठी या शहरात दाखल होत होते. त्यावेळी विनायक चक्रे हे डेविड ब्राऊन आणि मी खडकी येथील किर्लोस्कर ऑइल इंजिन व नंतर सँडविक या कंपनीमध्ये नोकरीस लागलो. कारखान्यांबरोबरच कामगारांची संख्या वाढत असताना कामगार आणि संघटनेचे विविध प्रश्न उद्भवत होते. त्या प्रश्नांना वाचा फोडून विविध माध्यमांमधून मांडण्याचा चक्रे आणि मी प्रयत्न करीत असे. (PCMC)

त्यावेळची नामांकित वृत्तपत्र आमच्या बातम्यांना प्रसिद्धी देत असत त्यातूनच कामगार चळवळ मोठी होत होती. कामगार संघटनेच्या वाढलेल्या व्यापामुळे विनायक चक्रे यांना नोकरी सोडावी लागली. नंतर ते लिखाणाची आवड आणि कामगार चळवळीतला अनुभव यामुळे दैनिक हेरॉल्ड, सामना, लोकसत्ता अशा विविध वृत्तपत्रांमधून लिखाण करू लागले. त्यांनी दिलेल्या बातम्यांची दखल रतन टाटा यांनी देखील घेतली होती.

रतन टाटा यांनी पिंपरीतील लेक हाऊस येथे भेटण्यास बोलवून त्यांचे कौतुक केले होते. मी देखील निवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात असताना कामगारांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने “पवनेचा प्रवाह” या नावाने ४ जानेवारी २००० रोजी साप्ताहिक सुरू केले. त्याचे उद्घाटन माजी आमदार अशोक तापकीर आणि तत्कालीन महापौर मधुकर पवळे यांच्या हस्ते केले होते. पुढील वर्षी हे साप्ताहिक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.

निवृत्तीनंतर विनायक चक्रे यांची आजारपणामुळे दृष्टी अधू झाली आहे. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर बंधने आहेत. मात्र आम्ही सर्व मित्र महिन्यातून एक रविवारी आवर्जून त्यांची भेट घेतो. बुधवारी विधानसभा निवडणुकीत मतदान करायचेच असा निश्चय त्यांनी केला होता. आम्ही सर्व मित्रांनी ठरवून त्यांना माझ्या दुचाकीवर बसवून मतदान केंद्रात आणले आणि त्यांनी व्हील चेअर चा वापर करून उत्साहाने मतदान केले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक दिलीपकुमार वाघ (वय ७५) आणि माधवराव चिमाजी (वय ६७) व मतदान केंद्रावरील स्वयंसेवकांनी मदत केली. मतदान केल्यानंतर घरी जाताना मी लिहिलेल्या आणि प्रवीण प्रकाशन या संस्थेद्वारे प्रकाशित केलेल्या “महासम्राज्ञी येसूबाई” या धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई यांच्यावर संशोधन करून लिहिलेल्या पुस्तकाची प्रत विनायक चक्रे यांच्या हस्ते देऊन स्वयंसेवकाचा सत्कार केला. धर्मवीर संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या पत्नी येसूबाई या सलग तीस वर्षे मुघलांच्या बंदी वासात होत्या. अशाप्रकारे हाल अपेष्टा सहन करीत बंदिवासात राहिलेल्या येसूबाई या जगातील एकमेव महिला आहेत, हे या पुस्तकातून मांडण्यात आले आहे. हे पुस्तक म्हणजे एक संशोधन ग्रंथ असून यासाठी विनायक चक्रे व इतर अनेक मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

मतदान करून झाल्यानंतर चक्रे यांना मी त्यांच्या घरी सोडले तेंव्हा मतदान केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

संबंधित लेख

लोकप्रिय