हरिनाम जयघोषात पांडुरंगरायांची पादुका पालखी आळंदीत प्रवेशणार (Alandi)
आळंदी / अर्जुन मेदनकर : श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यास ह.भ.प.श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे पायरी पूजनाने हरीनाम गजरात शनिवारी ( दि. २३ ) सुरुवात होत आहे. अलंकापुरी परिसरात भाविकांची गर्दी यात्रेसाठी होत आहे. (Alandi)
भक्तिमार्गावर हरिनाम गजरात राज्यातून भाविकांनी वाटचाल सुरु केली असून हजारो भाविक अलंकापुरीत नामजयघोष करीत श्री पांडुरंगरायांचे पादुका पालखीसह आळंदीत दाखल होत आहे. ज्ञानोबा माउली नामजयघोषात वारकरी भाविकांचे हैबतरावबाबा पायरी पूजनाने आळंदी कार्तिकी यात्रेस शनिवारी प्रारंभ होणार आहे.
हैबतरावबाबा यांचे वंशज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर परिवाराचे वतीने प्रथा परंपरांचे पालन करीत पायरी पूजन श्रीची आरती व महानैवेद्य पायरी पूजनात होईल.
या प्रसंगी आळंदीतील श्रीक्षेत्रोपाध्ये यांचे वेदमंत्रोपचारात पौरोहित्य केले जाणार आहे. श्री गुरु हैबतरावबाबा यांच्या दिंडीतील वारकरी भाविकांचे वतीने अभंग आरती, मंदिर प्रदक्षिणा करून हरीनाम गजरात सोहळ्यास हजारो वारकरी भाविकांचे उपस्थतीत सुरुवात होईल.
या वर्षीही हैबतरावबाबा ओवरीत आरती आणि त्यानंतर दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होणार आहे. या नंतर परंपरेने महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याचे पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार यांनी सांगितले. तत्पूर्वी पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर परिवार यांचे तर्फे माऊलींचे समाधीची पूजा होणार आहे. (Alandi)
हैबतरावबाबा पायरी पूजनास प्रमुख विश्वस्त जेष्ठ विधीतज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, दिघी आळंदी वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, दिघी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, भाऊ महाराज फुरसुंगीकर, सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, योगीराज कुऱ्हाडे, संतोष मोझे महाराज, अनिल कुऱ्हाडे, स्वप्नील कुऱ्हाडे, व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, श्रीधर सरनाईक, भीमा घुंडरे, दिंडीकरी, भाविक, आळंदी ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
परंपरेने यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते मानक-यांनासह पदाधिकारी यांना नारळ प्रसाद वाटप होईल.
पायरी पूजनाने ७२९ व्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळ्यास परंपरेने पहाटे पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या चल पादुकांवर महापूजा, श्रीना महानैवेध्य असे कार्यक्रम होणार आहेत.
शनिवारी ( दि. २३ ) विना मंडपात योगीराज ठाकूर यांचे वतीने कीर्तन, धुपारती, ह.भ.प.बाबासाहेब आजरेकर याचे तर्फे कीर्तन सेवा, मंदिर प्राकारासह महाद्वारातील श्री गुरु हैबतरावबाबा यांचे पायरी पुढे हरीनाम गजरात जागर आदी धार्मिक आयोजित करण्यात आले आहेत.
भाविक नागरिकांना यात्रा काळात गर्दी करून श्रवण सुखाचा लाभ मिळणार आहे. आळंदीत हरिनाम सोहळ्यास सुरुवात झाल्याने आळंदीत भक्ती उत्साह दिसत आहे.
इंद्रायणी नदी परिसर माउली मंदिर आदी ठिकाणी हरीनाम गजराला उधान आले आहे. श्री ज्ञानेश्वरी पारायणास विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज धर्मशाळेत दिलीप महाराज ठाकरे यांचे कीर्तनसेवेने तसेच आळंदीत परंपरेने सुरुवात होत आहे.
मंदिरात कार्तिकी वारी २०२४ चे सप्ताहास हरिनाम गजरात सुरुवात झाली आहे. या सप्ताहास भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त जेष्ठ विधीतज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांचे सह मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत सर्व विश्वस्तांचे मार्गदर्शनात मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरु झाले आहेत.
आळंदी देवस्थान देखील राज्यातील भाविकांचे स्वागतास सज्ज झाले आहे. मंदिरात तसेच मंदिर परिसरात देवस्थान तर्फे मंदिर, मंदिर परिसर आणि भाविक, नागरिक यांचे सुरक्षिततेसह आरोग्याची काळजी घेत नियोजन करण्यात आले आहे.
यासाठी तयारी पूर्ण होत आली आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य स्वच्छता सेवा, विद्युत रोषणाई, सीसीटीव्ही यंत्रणा, पोलीस बंदोबस्त, सुरक्षा रक्षक आणि स्वयंसेवक देखील कार्यरत ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली.
आळंदीतील कार्तिकी यात्रेच्या तयारीत नियोजना प्रमाणे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. यात्रेस राज्य परिसरातून लाखो भाविक आळंदीत येत असतात. भाविक,नागरिक यांची सुरक्षा आणि भाविकांना अल्प काळात दर्शन देण्याचे नियोजन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.
नवमी निमित्त रविवारी ( दि.२४ ) परंपरेने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमात श्रीना पवमान अभिषेक व दुधारती, भाविकांचे चलपादुकांवर महापूजा, महानैवेद्य, विना मंडपात बाबासाहेब देहूकर यांचे कीर्तन सेवे नंतर धुपारती व त्यानंतर वासकर महाराज यांचे वतीने परंपरेने कीर्तनसेवा रुजू होणार आहे.
मंदिरात भाविकांना महाप्रसाद चहा, खिचडीचे वाटप सुरु झाले.भाविकांसाठी लाडू प्रसाद व शेंगदाणा लाडू प्रसाद निर्मितीचे काम मार्तंड आप्पा ढोले यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे. आळंदीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी सांगितले.
पांडुरगरायांचा पादुका पालखी सोहळा आळंदीत प्रवेशणार
श्री पांडुरगरायांच्या पादुका पालखीचे आळंदीत श्रींचे संजीवन समाधी सोहळ्यासाठी हरिनाम गजरात आगमन शनिवारी होणार आहे.
तत्पूर्वी थोरल्या पादुका देवस्थानच्या वतीने पुणे आळंदी मार्गावर स्वागत करण्यात येणार असल्याचे थोरल्या पादुका संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विधीतज्ञ विष्णू तापकीर यांनी सांगितले.
श्रींचे पालखी सोहळ्या समवेत दिंडीसह आलेले वास्कर महाराज यांचे श्रीफळ प्रसाद देऊन थोरल्या पादुका देवस्थानचे अध्यक्ष विष्णू तापकीर स्वागत व सत्कार करतील. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण व कर्नाटकातील वारकरी श्री पांडुरंगरायांचे पादुका पालखी सोहळा पायी वारीत सहभागी झाले आहेत. यात हजारो वारकरी भाविक प्रवास करीत आहेत.
आळंदी वैभवी पूजा साहित्याला झळाळी
माउली मंदिरातील श्रींचे चांदीचे पूजा साहित्य, भांडी, चांदीचे दोन पालख्या, प्रभावळ, गाभारा आदी ठिकाणी असलेली चांदीची सजावटीला पॉलीस करून नवी झळाळी देण्यात आली. यासाठी पुण्यातील ज्वेलर्स मधील कारागिरांनी मोफत सेवी रुजू केली असल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर, बल्लाळेश्वर वाघमारे यांनी दिली. यासाठी सेवाभाव जपत कारागिरांनी विनाशुल्क सेवा रुजू केली. (Alandi)
कार्तिक वारी ठळक
पदपथ भाविकांसाठी खुले रहाणार ;- मुख्याधिकारी कैलास केंद्रे
तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुलभ शौचालये खुली, मंदिर परिसर, इंद्रायणी घाट,व शहरात सी.सी.टि.व्ही. यंत्रणा
सतर्क राहण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन
भाविकांची नगरप्रदक्षिणा सुखकर ; भाविकांत समाधान
यात्रा काळात दिंडीकरी ( पासधारक ), पाण्याचे टॅंकरसह अत्यावश्यक सेवा वाहनांना प्रवेश आदी सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.