सेवा, सुविधांबाबत समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य – शेखर सिंह (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन शहरातील नागरिकांना सेवा, सुविधांबाबत उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देत असून आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई केली जाईल असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
बुधवारी शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रतिनिधींची बैठक आयुक्तांसमवेत आयुक्तांच्या दालनात झाली. (PCMC)
यावेळी महिला काँगेस माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुगुटमल, अमर नाणेकर, वाहब शेख, माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, डॉ. मनिषा गरुड, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, ॲड. अशोक धायगुडे, जार्ज मॅथ्यू, शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, बाबासाहेब बनसोडे, केनिथ रेमी, सचिन कोंढरे पाटील, अर्चना राऊत, स्मिता पवार-मुलाणी, निर्मला खैरे, अबूबकर लांडगे, सतीश भोसले, वसंत वावरे, रवींद्र कांबळे, चंद्रशेखर जाधव, शहर सचिव ॲड. मोहन अडसूळ, योगेश बहिरट, दीपक भंडारी, अरुणा वानखेडे, कुंदन कसबे, राजन नायर, अज्जू जॉन, बाबा आलम शेख, सुरज कोथिंबीरे, तारीक रिजवी, माजिद अली, महानंदा कसबे आदींसह शहर काँग्रेस मधील इतर पदाधिकारी उपस्थित होते. (PCMC)
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अंतर्गत शहरात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरभर जनसंपर्क मोहीम राबवून नागरी समस्या जाणून घेतल्या होत्या. याबाबत एक विस्तृत निवेदन मागील १५ दिवसांपूर्वी आयुक्तांना देण्यात आले होते. याबाबत चर्चा करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळासमवेत बुधवारी बैठक घेतली होती.
यामधे काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय सेवा सुविधा, पाणीपुरवठा, मेट्रो, सार्वजनिक आरोग्य, अल्पसंख्याक समाजासाठी स्मशानभूमी, वाहतूक, अरुंद रस्ते, अतिक्रमण झालेले पदपथ, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, विद्युत व उद्यान विभाग विषयी तक्रारी आयुक्तांपुढे मांडल्या.
तसेच मनपाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित करावी. उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक भरती करावी. शहराचा चौफेर विस्तार होत असताना वाढत्या शहरीकरणामध्ये मध्ये ख्रिश्चन व मुस्लिम समाजाला आवश्यक प्रमाणात स्मशानभूमी उपलब्ध करून द्याव्यात. वैद्यकीय सेवा प्रभावीपणे राबवून कॅन्सर रुग्णालय उभारणीसाठी चालना देऊन जळीत रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची निर्मिती करावी.
म्हाडा कॉलनी, देहू – आळंदी बीआरटी रोड, त्रिवेणी नगर परिसरातील दूषित पाणीपुरवठा बाबत प्रत्यक्ष पाहणी करावी. पिंपरी स्टेशन जवळील उद्यानाचे आरक्षण विकसित करावे, पिंपरी कॅम्प परिसर व गावठाणातील वाहतूक समस्यावर निर्णायक तोडगा काढावा. मेट्रो स्टेशन परिसरात प्रवाशांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. पिंपरी, दापोडी, कासारवाडी नदीकिनारी सीमाभिंत उभारावी.
शहरातील गोरगरीब नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्यामुळे कृपया वैद्यकीय सेवा नागरिकांना व्यवस्थित मिळणे करिता आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. तसेच वैद्यकीय सेवेसाठी हेल्पलाइन सुरू करावी.
पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याचे दिसून येत आहे.
पूर्ण दाबाने २४ तास स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा याबाबत शहर काँग्रेसने दिनांक २४/०२/२०२२ रोजी महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला. दिनांक १९ मे २०२२ रोजी काँग्रेसच्या वतीने महानगरपालिकेसमोर “बेमुदत उपोषण” केले होते. तरी आजपर्यंत शहरातील पाणी समस्येवर निर्णय झालेला नाही. अनेक सोसायट्यांना अजूनही टँकरद्वारे पाणी घ्यावे लागते. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती जाहीर करावी. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील कचरकुंड्या मुक्त करण्याचा उपक्रम चांगला आहे पण यामुळे शहरातील रस्त्यांवरील कचरा वाढत आहे.
त्यामुळे शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना, महिलांना, लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अनेक झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालय स्वच्छता नसणे, त्याची दुरावस्था व पडझड झालेली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी त्याठिकाणी जुने सार्वजनिक शौचालय पाडून नवीन बांधण्यात यावे अथवा दुरुस्तीची कामे करण्यात यावीत. पदपथावरील दिवे देखभाल दुरुस्तीची कामे वेळेवर होत नाहीत, रस्त्यावर काही भागात विद्युत विभागाचे डीपी धोकादायक अवस्थेमध्ये आहेत.
विविध उद्याने ठेकेदारास देखभाल दुरुस्ती करता दिलेली आहेत, परंतु उद्यानांची देखभाल दुरुस्ती व्यवस्थितपणे होत नाही. उद्यानांमध्ये शौचालय नाही जेथे आहे तेथे अस्वच्छता आहे, लाईट, पाणी व्यवस्था नाही. ज्येष्ठ नागरिकांना जॉगिंग ट्रॅक असणे आवश्यक आहे. लहान मुलांची खेळणी दुरुस्त करावीत अथवा नवीन बसविण्यात यावीत. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत अशा विविध नागरी समस्यां आयुक्तांपुढे मांडण्यात आल्या. शहरातील पार्किंग समस्येवर आपण काय उपयोजना केली आहे ? नदीकाठचे अनाधिकृत बांधकाम आणि नदी प्रदूषण बाबत काय निर्णय घेतला आहे ? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले, यानंतर आयुक्तांना विस्तृत निवेदन देण्यात आले.