![n58578115217090239360181c78739f94771e6a4fb3f744edc4a9bc48e535e6fb3636e422f2b75947dd0174](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/02/n58578115217090239360181c78739f94771e6a4fb3f744edc4a9bc48e535e6fb3636e422f2b75947dd0174.jpg)
पिंपरी चिंचवड : जाधववाडी, चिखली पश्चिम बंगाल येथील एका तरुणाने १३ वर्षांच्या मुलीला फूस लावून पळवून नेले होते. त्याने मोबाईल बंद ठेवल्याने त्याचा तपास लागत नव्हता. चिखली पोलिसांनी अथक परिश्रम करून त्या तरुणाला हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागातून शोधून काढून त्या मुलीची सुटका करण्यात यश मिळविले आहे.
२६ जानेवारी रोजी या मुलीच्या पालकांनी आपली अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार चिखली पोलीसठाण्यात नोंदविली होती. त्यावरून ४१/२०२४ क्रमांकाने भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ती मुलगी एका अज्ञात व्यक्तीबरोबर जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी अधिक तपास करता तो तरूण कुदळवाडीतील एका चिकन सेंटरवर काम करणारा सुरोज रेजाऊल शेख वय २१ हा असून तो मूळचा मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल येथील असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तेथे जाऊन त्याच्या आईवडिलांकडे चौकशी केली. मात्र,पोलिसांनी त्याचा फोन ट्रेस करण्याचे प्रयत्न चालू ठेवले. त्यावेळी तो हैद्राबाद येथील शोईल शेख आणि रुपसिंग ठाकूर या नेपाळी मुलाच्या नियमीत संपर्कात असल्याचे पोलिसांना समजले. रुपसिंग ठाकूर याचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले असता तो चंदीगड ते सिमला हिमाचलप्रदेशच्या पूर्व बाजूकडील भागात वावरत असल्याचे पोलिसांना समजले.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 शिवाजी पवार,
सहायक पोलीस आयुक्त संजय गौर, चिखली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी सहायक निरीक्षक खाडे, हवालदार अमर कांबळे व नाईक सुरज सुतार असे पथक हिमाचल प्रदेशला पाठविले. त्यांनी तेथे जाऊन पहाडी भागात सुरोजचा शोध घेतला असता भोजनगर, ता. परवानू, जिल्हा सोलन, राज्य हिमाचल प्रदेश या ठिकाणी तो एका ठेकेदाराकडे मजुरी करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन त्याला आणि त्याने अपहरण केलेल्या मुलीला ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस उपआयुक्त परिमंडळ – ३ शिवाजी पवार, सहायक आयुक्त संजय गौर, वरीष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उध्दव खाडे, नाईक अमर कांबळे, सुरज सुतार,कबीर पिंजारी यांनी केली.