Thursday, December 5, 2024
HomeNewsPCMC:छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महापालिकेच्या वतीने जागर

PCMC:छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महापालिकेच्या वतीने जागर

भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचे हस्ते प्रबोधन पर्वाचे उद्घाटन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरूषांचे विचार किंवा त्यांची जीवनयात्रा ही युवा पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत असते आणि त्यांच्या या विचारांचा जागर व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वासारख्या विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

        पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२४ चे आयोजन भक्ती-शक्ती चौक निगडी,संभाजीनगर चिंचवड, डांगे चौक थेरगाव आणि एच.ए. कॉलनी,पिंपरी या चार ठिकाणी करण्यात आले आहे. या पर्वाचे उदघाटन भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते झाले त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.


          या कार्यक्रमास उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सचिन चिखले, विजय बोऱ्हाडे, शिवशाहीर अंबादास तावरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जाधव, सागर तापकीर, धनाजी येळेकर, अभिषेक म्हस्के, सचिन बोऱ्हाडे, जीवन बोऱ्हाडे, रोहिदास शिवणकर, संदीप नवसुपे, संदेश पाचपुते, प्रकाश जाधव, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गीड्डे, तसेच शिवजयंती भक्ती-शक्ती समितीचे सदस्य तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

         अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, कार्य सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावेत त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे तसेच शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन सलग तीन दिवस महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच महापालिका माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध, वक्तृत्व तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या विचार प्रबोधन पर्वातील सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी खुले आणि विनामूल्य असून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहनही यावेळी जगताप यांनी केले.   


यावेळी शिवशाहीर यशवंत गोसावी यांनी “असे होते छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावरील व्याख्यान सादर केले. व्याख्यानात बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजविणे ही काळाजी गरज आहे.त्यांचे विचार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना कळावेत यासाठी दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते.या महापुरूषांची  जयंती साजरी करत असताना आपल्या मुलाने किंवा मुलीने त्या विचारांचा वारसा जोपासला पाहिजे असा निर्धार प्रत्येक आई वडिलांनी केला पाहिजे. चांगला विचार समाजामध्ये पेरला गेला तरच येणाऱ्या पिढीकडून समाजप्रबोधनाचे कार्य घडेल.

त्यानंतर मराठी चॅनेलवरील प्रसिद्ध शिवशाहीर संतोष साळुंखे यांनी पोवाड्यांचा कार्यक्रम सादर करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमय इतिहास उपस्थितांपर्यंत पोहोचवला.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसदस्य मारूती भापकर यांनी आणि सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय