अखेर कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटर केला. ट्विटरवर “विकास दुबे मारा गया” ट्रेंड सुरु झाला. सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. गेल्या आठवड्यात हुतात्मा झालेल्या पोलिसांना न्याय मिळाला. कुख्यात गुंड विकास दुबे मेला! इथंपर्यंत ठीक, परंतु गुंड पोसणाऱ्या लोकांचे काय? विकास दुबे फेक एन्काऊंटर मध्ये मारला गेल्याची चर्चा सुरू झाली, गुंड पोसणारे नेते पडद्याआड राहिले हे सर्व मान्य आहे. लोक आणखी चार दोन दिवस बोलतील नंतर विसरतील, या पेक्षा वेगळं होणार काय?
फेक एन्काऊंटर हा देशासाठी नवीन नाही आणि खास करून उत्तर प्रदेश साठी. कोणतीही पोलीस चौकशी करण्या अगोदरच यंत्रणेने व्यवस्थित गाडी पलटी झाल्याचा बनाव केला आणि गुंड विकास दुबेला मारून टाकले अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. राजकीय नेत्यासोबतचे अनेक राज “राजच” राहिले. जर तसे झाले नसते तर सरकार पडण्याची शक्यता होती, असे काही लोक सांगतात.
हल्ली अशा शंकास्पद प्रकरणाला एन्काऊंटर म्हणतात हि विशेष बाब. या बातमीचा घटनाक्रम पाहिल्या नंतर हा एन्काऊंटर नसून नेत्यांना वाचवण्यासाठी केलेली हत्या तर नाही अशी शंका निर्माण होते. ‘विकास दुबे’च्या एन्काऊंटरची बातमी ऐकल्यावर हैद्राबाद एन्काऊंटरची आठवण झाली, त्यावेळी सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यावेळी सुद्धा पोलिसांनी आरोपीची हत्या केली की, एन्काऊंटर यात शंकाच येते. त्या घटनेनंतर पोलिसांनी एन्काऊंटर म्हणून हात झटकले. जर ती हत्या असेल तर पोलिसच आरोपींशी असा व्यवहार करणार असतील तर गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये फरक काय? जोपर्यंत आरोपीला कायदेशीर शिक्षा होत नाही, तो पर्यंत आरोपीला संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिसांची असते. जर पोलिसच कायदा हातात घेऊ लागले, तर न्याय व्यवस्थेचे काय होणार?
उत्तर प्रदेश सरकार जर खरच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करत होते, तर जवळपास ३० वर्षांपासून गुन्हेगारी वृत्ती असणाऱ्या विकास दुबे वर खुनासारखे गंभीर ६० गुन्हे दाखल असताना का कोणत्याही प्रकरणात कधी शिक्षा झाली नाही? विकास दुबेवर २००१ साली राजनाथ सिंह यांचे सरकार असताना राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची पोलीस ठाण्यात घुसून हत्या केल्याचा आरोप असताना, का कोणी साक्ष देऊ शकला नाही?
काही रिपोर्ट नुसार विकास दुबेचे अनेक राजकीय पक्षांमध्ये उठबस होती. यावरून विकास दुबेवर गंभीर ६० गुन्हे दाखल असताना आणि अनेकदा अटक होऊन शिक्षा होत नसल्याचे कारण उघड आहे. विकास दुबेला अटक केल्यावर अनेक मोठे खुलासे बाहेर येतील याची भीती विकास दुबेला पोसणाऱ्यांना नसेल काय? काहींनी विकास दुबेचा एन्काऊंटर करण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर आपले पितळ उघडे पडण्या अगोदरच त्यांनी विकासचा खात्मा करून स्वतःचा बचाव केला, अशी ही चर्चा लोकांमध्ये होताना दिसत आहे. जर हे पूर्व नियोजित असेल तर, यात विकास जितका गुन्हेगार होता, तितकेच गुन्हेगार त्याला पोसणारे लोक आहेत आणि त्या लोकांना वाचवण्यासाठी ज्या पोलिसांनी विकासाची हत्या/एन्काऊंटर केला ते पोलीस सुद्धा तितकेच जबाबदार आहेत.
– विशाल पेटारे
– जुन्नर, पुणे