Thursday, December 26, 2024
Homeकृषीनो केमिकल, नो टेन्शन; मायणीतील संजय गुदगे यांची विषमुक्त सेंद्रिय शेती

नो केमिकल, नो टेन्शन; मायणीतील संजय गुदगे यांची विषमुक्त सेंद्रिय शेती

निसर्ग नियमित फळशेतीमुळे उत्पादकता वाढते, जमिनीचा पोत खराब होत नाही – गुदगे 

सातारा : आपल्या देशात 1970 पर्यंत शेतकरी कोणत्याही प्रकारची रासायनिक खते वापरून शेती करत नव्हते. त्या काळात पिकांवर रोगराई पण येत नव्हती. देशातील औद्योगिकरण वाढत गेले, काही मोठे दुष्काळ पडले आणि अन्नधान्यासाठी सरकारने हरित क्रांतीचा यशस्वी प्रयोग केला. मात्र 1970 ते 1990 च्या कालखंडात अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खते वापरली जाऊ लागली, रासायनिक फवारणी सुरू झाली, मात्र फळे,आणि भाजीपाला हा पूर्णतः रासायनिक खतावर अवलंबून राहिल्यामुळे मानवी आरोग्यचे प्रश्न निर्माण झाले. गेली 7 वर्षे आमच्या 20 एकरात पेरू, चिकू, डाळिंबे, पपई, स्ट्रॉबेरी याचे उत्पादन घेतो. मात्र कोणतेही रासायनिक खत वापरत नाही, असे संजय गुदगे यांनी सांगितले.

कोणतेही पीक वाढण्यासाठी त्याचे पोषण जमिनीतील सूक्ष्मजीवांमार्फत केले जाते. या कामापोटी सूक्ष्मजीव जे काम करतात ते त्यांना करू दिले पाहिजे, फळांच्या झाडांना निसर्गातील पौष्टीक खाद्य मिळाले तर त्याची उत्पादकता दुप्पट होते. फळझाडाला पाणी आणि जनावरांचे मलमूत्र मिश्रीत सुकी मासळी सह पालापाचोळा याचे खत वापरतो.

फळझाडांना काय हवे ते त्यांना समजते आपण अनैसर्गिक खाद्य रसायन देऊन त्यांना अवैध पद्धतीने वाढवतो. निसर्ग नियमित सेंद्रिय शेतीमुळे फळझाडे किंवा अन्य पिकपाणी कोणत्याही रोगांवर स्वतःच मात करतात.

शेतीसाठी रासायनिक औषधांचा अमर्यादित वापर होत आहे. त्यातून आपण पोषक अन्न पिकविण्याऐवजी विषारी अन्नपदार्थांचे उत्पादन व निर्मिती करीत आहोत. मानवासह सजीव आणि निसर्गासाठी हा मोठा धोका आहे. याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. या विनाशाला रोखणे ही आपली जबाबदारी आहे. आपण हे कर्तव्य पार न पाडल्यास पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. असे संजय गुदगे यांनी सांगितले—आमच्या 20 एकरातून आम्हाला फळांच्या उत्पादनातून आमच्या कुटुंबाला पुरेल इतके उत्पन्न मिळवतो आणि चिकू, पेरू, डाळिंबे, पपई या फळांना रसायन नाही त्याची मागणी भरपूर आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर सारख्या शहरातील लोकांनाकडून फळांना मागणी असते, असेही गुदगे म्हणाले.

ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कमी पाण्यात कोणतेही केमिकल न वापरता भाजीपाला, फळे, कडधान्य इ पिकाची उत्पादकता दुप्पट वाढवण्याचे तसेच जमिनीचा पोत ही कसा टिकवून दुबार तिबार पीक घेता येते आणि आर्थिक उन्नत्ती करून घेता येते यासाठी खास प्रशिक्षण ही ते देतात. हे प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्ष शेतामध्ये शिकवले जातात. बाजारात पैशाने बरेच काही विकत घेता येते, मात्र निसर्गनिर्मित माती आणि त्याचा पोत विकत घेता येत नाही.

त्यांचा मुलगा कौस्तुभ गुदगे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चा पदवीधर आहे, संजय आई पल्लवी गुदगे हे वाणिज्य पदवीधर आहे. मायणी, खटाव, सातारा परिसरातील अनेक तरुण शेतकऱ्यांना त्यांनी सेंद्रिय फळे आणि फुलांच्या शेतीचे ज्ञान दिले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय