नांदेड : तालुक्यातील बोरगांव (तेलंग) येथील ग्रामपंचायत निवडणूक अखेर बिनविरोध करण्यात गांव पुढाऱ्यांना यश आले आहे. कोविड – १९ महामारीच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने ग्राम पंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्या पासून निवडणूक घोषित झालेल्या गावात गट तट,रुसवे फूगवे, वादविवाद असे प्रकार प्रामुख्याने पहावयास मिळत आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीत भाव भावकी, सगे सोयरे, आप्त मित्र देखील एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून तयारीत असतात. काही ठिकाणी तर निवडणूकीच्या कारणांमुळे वादविवाद टोकापर्यंत पोहोचतात, म्हणून वरील प्रकार थांबावेत व गावामध्ये सलोखा कायम राहावा या उद्देशाने बोरगांव येथील क्षीरसागर, कंधारे, निवडंगे व पुरी अशा निर्णायक मतदार असलेल्या प्रमुख कुटुंबियांनी सर्वच ग्राम पंचायत सदस्य बिनविरोध निवडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
दि.४ जानेवारी रोजी सात सदस्य असलेल्या ग्राम पंचायत मध्ये सर्व सात सदस्य बिनविरोध निवडून आणले आहेत. राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनेच्या धर्तीवर बोलबाला असलेल्या आमदार, खासदार निधीतून विशेष बक्षीस मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या या गावास आमदार आणि खासदार निधीतून भरीव निधी मिळणार असल्याचे बोलल्या जात असून काही ठिकाणी तर बिनविरोध ग्राम पंचायतीसाठी पन्नास लाखापर्यंत विशेष निधीची घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.
ई- स्वराज ॲप च्या माध्यमातून गावामध्ये झालेल्या खर्चाचा तपशील पाहणे सहज शक्य होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना देखील गावातील विकास आराखडा पाहणे सोयीचे झाले आहे. येथील निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे तेथील नागरिकांचे कौतुक करण्यात येत असून नवनिर्वाचित विजयी सदस्यांचे अभिनंदन होत आहे.
निवडून आलेले सदस्य अनिल शिवाजीराव क्षीरसागर (खुला प्रवर्ग), राजू विश्वनाथ कंधारे (अ.जा.), केशवराव क्षीरसागर (खुला प्रवर्ग), वच्छलाबाई जळबाजी निवडंगे (अ.जा.), गिरजाबाई बालाजी क्षीरसागर (खुला प्रवर्ग महिला), लक्ष्मीबाई नागेंद्रबुवा पूरी (इतर मागास), कलावतीबाई रतनबुवा पूरी (इतर मागास प्रवर्ग) यांचा समावेश आहे. बिनविरोध निवडणूक होण्यासाठी आनंदा पाटील क्षीरसागर, कोंडिबा निवडंगे, नारायण कंधारे, माधव कंधारे, शिवाजी पाटील क्षीरसागर, रतनबुवा पूरी, गंगाधर कंधारे, नागोराव निवडंगे आदींनी प्रयत्न केले.