Saturday, May 18, 2024
Homeराज्यराज्यभरात पारा वाढला : चंद्रपूर, सोलापूर, रत्नागिरी चाळिशी पार, उर्वरित शहरांचे तापमान...

राज्यभरात पारा वाढला : चंद्रपूर, सोलापूर, रत्नागिरी चाळिशी पार, उर्वरित शहरांचे तापमान 39 अंशापर्यंत

उन्हाच्या काहिलीने अंगाची लाही लाही वाढली

औरंगाबाद : गत १० दिवसांपासून हवामानात अनपेक्षित व वेगाने बदल होऊन ढगांचे आच्छादन अधिक काळ राहिले. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही मोजक्याच ठिकाणी हलका ते अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची नोंद झाली. तापमान ३५ ते ३९ अंशांवरून ३३ ते ३५ अंशांपर्यंत घसरले होते. मात्र, आता पावसाचे सावट निवळत असून सूर्य आग ओकू लागला आहे. चंद्रपूर ४०.२, सोलापूर ४०.३ आणि रत्नागिरी ४० अंशांवर जाऊन पोहोचले आहे. औरंगाबादचा पारा तीन दिवसांत ४ अंशांनी वाढून ३३ वरून ३७ अंशांवर गेल्याची नोंद शुक्रवारी झाली. तर आठ दिवसांत पारा आणखी उच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. उन्हाच्या काहिलीने अंगाची लाही लाही वाढली आहे.

मार्चचे पहिले १३ दिवस सूर्य चांगलाच तळपला. औरंगाबादचे तापमान १ ते १२ मार्च दरम्यान ३६ अंशांवर राहिले होते. हे गतवर्षीच्या तुलनेत ३ ते ७ अंशांनी तापमान जास्त राहण्याची नोंद कुलाबा आणि चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. तर विदर्भात पारा ३७ ते ३९ अंश, उर्वरित शहराचे तापमान ३५ ते ३७ अंश दरम्यान राहिले. दिवस-रात्रीच्या तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या काहिलीने अंगाची लाही लाही वाढली होती. मात्र, याच बरोबर अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वारे वाहिले. कमी हवेचा दाब तयार झाला. चक्राकार वाऱ्यांचा दाब सक्रिय राहिला. परिणामी आकाशात थंड, उष्ण वाऱ्यांमुळे ढगांची चादर पसरली. सापेक्ष आर्द्रता १०० टक्क्यांवर जाऊन वादळी वारे आणि मेघ गर्जनेसह औरंगाबादेतील फुलंब्री, जालना जिल्ह्यातील भोकरदन, विदर्भ आदी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची नोंद झाली. बुधवारी महाबळेश्वर आणि रत्नागिरीत काश्मीरप्रमाणे गारपीट व अवकाळी पाऊस पडण्याची नोंद हवामान विभागाने घेतली. पण बुधवारपासून गारपीट व पावसाचे वातावरण निवळून तापमानात वाढ होत आहे. तर पुढील आठ दिवसांत चंद्रपूरसह अनेक शहरांचे तापमान ४० ते ४२ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

हवा, पाऊस, गारपिटीमुळे रात्रीचे तापमान कमी

२३ मार्च रोजी औरंगाबाद शहराचे तापमान ३३ अंशांवर होते ते २४ मार्च रोजी एकाच दिवसात ३ अंशांनी तापमान वाढ झाली. अशीच स्थिती इतर शहरांची होती. म्हणजेच उष्णता, उकाडा, दमट वातावरण राहत आहे. गारपीट व पावसामुळे गारवा देखील जाणवतोय. किमान तापमान १ ते २ अंशांनी कमी आहे. मात्र, दिवसाचे तापमान ३ ते ८ अंशांपर्यंत वाढले आहे. सर्वाधिक रत्नागिरीचे कमाल तापमानात ८ अंशांनी तर उर्वरित शहरांचे तापमान ३ ते ४ अंशांपर्यंत वाढलेले आहे. त्यामुळे उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. महाबळेश्वरचे कमाल तापमान ३२ अंश सर्वात कमी नोंदवले गेले. उर्वरित शहरांचे तापमान ३५ ते ४०.३ अंश दरम्यान असल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक शहारांचा पारा हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय