जुन्नर / आनंद कांबळे : डिसेंट फाउंडेशन जुन्नर, माजी विद्यार्थी संघ – श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर व विद्यार्थिनी कल्याण मंडळ जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे किशोरवयीन मुलींसाठी “कळी उमलताना” किशोरवयीन मुली, वैयक्तिक स्वच्छता व जनजागृती अभियान तसेच गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डिसेंट फाउंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी “कळी उमलताना”….. किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता व जाणीव जागृती अभियान हा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यात सुरू केला असून या तीनही तालुक्यातील जवळपास ३० महिला डॉक्टर या उपक्रमासाठी आपला वेळ देऊन किशोरवयीन मुलींना मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता, शारीरिक व मानसिक आरोग्य, आहार व व्यायाम या विषयावर मोफत मार्गदर्शन करत आहेत. तसेच डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत २२ हजार मुली व माता पालकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवला असून त्यांना मोफत मार्गदर्शक पुस्तिका व सॅनिटरी पॅडचे वाटप देखील केलेले आहे.
किशोर अवस्थेत मुलींनी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य, मासिक पाळी, शरीरात होणारे बदल, आहार, व्यायाम वैयक्तिक स्वच्छता, पर्यावरण पूरक व योग्य सॅनिटरी पॅड चा वापर, कॅन्सर अशा अनेक विषयांवर डॉक्टर संपदा तोडकर व डॉक्टर कल्याणी पुंडे यांनी मुलींना मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागात समाजामध्ये आजही मासिक पाळी विषयी अनेक अंधश्रद्धा व गैरसमज आहेत. तसेच आई आणि मुली यांच्यात संवाद नसल्यामुळे अनेक संकटांचा सामना किशोरवयीन मुलींना करावा लागतो. त्यामुळे वयात येणाऱ्या मुला मुलींसोबत आई – वडिलांनी निसंकोच पणे संवाद साधला पाहिजे, असे मत डिसेंट फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक एफ.बी.आतार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
डिसेंट फाउंडेशन च्या वतीने यावेळी इयत्ता अकरावीतील कला शाखेच्या २०० विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड व मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. तसेच श्री शिवछत्रपती महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान व व्होकेशनल विभागात प्रथम तीन क्रमांकात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, जूनियर कॉलेज च्या उपप्राचार्य प्राध्यापिका पी.एस.लोढा, जुनिअर कॉलेज चे पर्यवेक्षक प्राध्यापक एस. ए. श्रीमंते, माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्राध्यापक शरद मनसुख, विद्यार्थिनी कल्याण मंडळाच्या प्रमुख प्राध्यापिका कविता शिंदे, तसेच सर्वच प्राध्यापिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.